चीनमध्ये इन्फ्लुएंसर्ससाठी कडक नियमावली लागू
चीनच्या 25 ऑक्टोबर पासून सायबरस्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (CAC) द्वारे हा नवा कायदा लागू झाला आहे. ऑनलाइन चुकीची माहिती, चुकीचे उपचार आणि खोटी आर्थिक माहिती यांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या नियमाचा मुख्य उद्देश आहे. आता सोशल मीडियावर आरोग्य, वित्त, शिक्षण किंवा कायद्याबद्दल बोलू इच्छिणाऱ्या कोणत्याही इन्फ्लुएंसरला त्या क्षेत्रातील अधिकृत प्रमाणपत्र, परवाना किंवा पदवी सादर करणे बंधनकारक आहे.
संबंधित क्षेत्रात अधिकृत पदवी किंवा परवाना असलेल्या व्हेरिफाईड तज्ञांनाच अशा प्रकारचा कंटेन्ट सोशल मीडियावर पोस्ट करता येणार आहे.
हा नवा नियम केवळ इन्फ्लुएंसर्स बरोबरच Douyin, Weibo आणि Bilibili यांसारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लागू करण्यात आला आहे. या कंपन्यांना आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणारे लोक योग्य आणि व्हेरिफाईड आहेत की नाही, याची खात्री करावी लागणार आहे.