सात एकरांतील पिकाचं नुकसान, शेतकऱ्याच्या पदरी विम्याचे अडीच रुपये
पालघर, दि. ३ : लांबलेल्या पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याचे काम संथावलेले आहे तर पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे. वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतात साचलेल्या पाण्यामुळे भाताला पुन्हा कोंब फुटून हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सात एकरवरील नुकसानीसाठी शिल्लोत्तर येथील शेतकऱ्याच्या बँक खात्यात नुकसानभरपाईपोटी चक्क दोन रुपये ३० पैसे जमा झाले आहेत.
मधुकर पाटील असं या शेतकऱ्याचे नाव आहे. पीक विमा काढला आहे. जुलै ते ऑगस्टदरम्यान भातलागवडीच्या वेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले होते. राज्य सरकारकडून त्यांना सुमारे एक हजार रुपयांची भरपाई देण्यात आली होती. मात्र पिकांचे त्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यातच विमा विमा योजनेंतर्गंत चक्क 2 रुपये 30 पैशांची भरपाई त्यांच्या बँकखात्यात जमा झाली आहे.
या संतापजनक भरपाईमुळे शेतकरी मधुकर पाटील यांनी सरकारच्या या कृतीवर तीव्र रोष व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या नुकसानीपोटी केवळ 2 रुपये 30 पैसे देऊन सरकारने जणू शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी त्यांची भावना आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतरही इतकी तुटपुंजी रक्कम मिळणे, हे शासनाच्या कार्यपद्धतीवर आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. पाटील यांनी या गंभीर त्रुटीकडे लक्ष वेधले असून, योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी मागणी केली आहे.
SL/ML/SL