वादळातील दोन बोटीवरील खलाशांना वाचवणारा युवक ठरला देवदूत….
अलिबाग दि ३ : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजापाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या दोन बोटीवरील १५ खलाशांना सुखरूप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला असल्याने तो त्या १५ खलाशांसाठी देवदूत ठरला आहे.
नुकताच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगड मधील मच्छीमारी साठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटला होता. त्यात करंजा येथील मच्छिंद्र नाखवा मालकाच्या महागौरी व नमो ज्ञानेश्वरी या दोन बोटिंचाही संपर्क तुटला होता. त्या दोन बोटींची वायरलेस यंत्रणा जीपीएस यंत्रणा ही बंद होती. त्या बोटींचे काय झाले त्या बोटींवर १५ खलाशी आणि तांडेल कुठे आहेत हे कोणालाच ठाऊक नव्हते.
बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने अनेक प्रयत्न केले कोस्टगार्डकडेही तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतु कोणताही सुगावा लागत नव्हता. फक्त मुंबई पासून आठ तास आतमध्ये त्यांचे एकदा लोकेशन मिळाले होते. त्यानुसार बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने करंजा येथील युवक अतिश सदानंद कोळी यांना या बोटीचा शोध घेण्यास पाचरण केले.
समुद्र खवळलेला असताना आपल्या जीवाची पर्वा न करता अतिश कोळी, यांच्यासह भानुदास कोळी बोट मॅनेजर आणि तांडेल असे चौघे जण २७ ऑक्टोबरला उरण च्या करंजा येथून बचावासाठी निघाले. बोटीवरील जीपीएस बंद पडलेला असल्याने मोबाईल च्या जीपीएस च्या सहाय्याने अतिश आणि त्याचे साथीदार जवळपास आठ तासांनी जीपीएस च्या लोकेशनच्या ठिकाणी बोट घेऊन पोहोचले.
परंतु त्या ठिकाणी कोणत्याही बोटी आढळून आल्या नाहीत. शोध घेत असताना रात्रीच निघण्याचा साथीदारांच्या मनात आले होते. मात्र अतिशने आपण सकाळी शोध घेऊ असे सांगून बोट त्याच ठिकाणी नांगरून ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी बोटींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर बोटी दिसून आल्या मात्र परिस्थिती पाहता दोन्ही बोटी नादुरुस्त झालेल्या होत्या.
एका बोटीचे गिअर तुटले होते तर दुसऱ्या बोटीच्या पंपाचे काम निघाले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी बोटी वादळामध्ये एकमेकांना बांधून नांगरून ठेवल्या होत्या.
त्या दोन्ही बोटीवरील राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि आणखी ९ खलाशी चार दिवस कोणतेही अन्न न शिजवता फक्त बिस्किट आणि पाण्यावरती होते.
खूप घाबरलेल्या आजारी अवस्थेत असलेले खलाशी आपला जीव मुठीत धरून होते. कोणीतरी आपला जीव वाचविण्यासाठी देवदूत आला असल्याने ते बिनधास्त झाले. अतिश आणि त्याच्या साथीदाराने बंद पडलेल्या दोन्ही बोटी त्यांनी नेलेल्या बोटिला दोरीच्या साहाय्याने बांधून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.
वादळामध्ये दोन्ही बोटी एकमेकांना बांधून आणने खूप अवघड होते. आणतेवेळी अनेक अडचणी आल्या होत्या. त्यांनी बांधलेले दोरही तुटले होते. या सर्व अडचणींवर मात करीत २४ तास प्रवास करीत १५ खलाशी आणि दोन्ही बोटी घेऊन करंजा बंदरात दाखल होऊन त्या १५ खलाशांचा जीव वाजवणारा अतिश हा देवदूत ठरला आहे.ML/ML/MS