घोडपदेव येथील महापालिका नवीन ई वॉर्ड कार्यालयामुळे नागरिक हैराण
भायखळा येथील महापालिकेचे जुने ई-प्रभाग कार्यालय घोडपदेव येथे स्थलांतरित केल्याने नागरिकांची पायपीट वाढली आहे. शिवाय या कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांना ६० ते ८० रुपयांची पदरमोड करून टॅक्सीने दूर घोडपदेव येथे जावे लागत आहे. तेथेही सर्वच विभाग कार्यरत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे.
भायखळा पश्चिम येथे असणारे पाच मजली इमारतीत जुने ई-प्रभाग कार्यालय होते. मात्र ही इमारत धोकादायक जाहीर झाल्याने महापालिकेने हे कार्यालय सप्टेंबरपासून घोडपदेव येथे स्थलांतरित केले. ते जुन्या कार्यालयापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर दूर आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधवांना जुन्या कार्यालयापासून येऊन नवीन कार्यालयात जाताना टॅक्सीसाठी ६० ते ८० रूपये खर्च करावे लागतात. शिवाय जुन्या कार्यालयातही काही विभाग अद्याप येथे कार्यरत नसल्याने पुन्हा नवीन कार्यालयातून जुन्या कार्यालयात येताना नागरिकांची पायपीट होते. पालिकेने नागरिकांचा विचार न करता थेट निर्णय घेऊन हे कार्यालय स्तलांतरित केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे येथे येणाऱ्या लोंकानी सांगतिले.
तर दुसरीकडे पालिकेने ई-प्रभाग कार्यालय नव्याने उभे होईपर्यंत भायखळा रेल्वे स्थानक परिसरात सर्वांना सोईचे होईल असे तात्पुरते कार्यालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच महापालिकेने नोटिफिकेशन काढून कोण कोणते खाते निवड येथील जुन्या कार्यालयात आहेत तसेच कोणकोणती खाते घोडपदेव येथील नवीन कार्यालयात आहेत याबाबत सविस्तर माहिती नागरिकांना महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावी याची माहिती द्यावी.