माझी पत्नी हिंदू, ती ख्रिश्चन धर्म स्वीकारेल..; अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचं विधान
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी त्यांच्या हिंदू पत्नीच्या धर्मांतराबाबत केलेल्या विधानामुळे अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेची लाट उसळली आहे. मिसिसिपी येथे आयोजित ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या कार्यक्रमात भाषण करताना व्हान्स यांनी त्यांच्या पत्नी उषा व्हान्स हिने भविष्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारावा अशी इच्छा व्यक्त केली. एका भारतीय वंशाच्या तरुणीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “माझी पत्नी उषा हिंदू संस्कृतीत वाढलेली आहे. ती ख्रिश्चन धर्म स्वीकारेल अशी मला आशा आहे. विशेषतः कॅथलिक चर्चच्या प्रभावामुळे ती एक दिवस कॅथलिक बनेल अशी माझी इच्छा आहे.”
उषा व्हान्स या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्या हिंदू कुटुंबात वाढलेल्या आहेत. त्या एक प्रतिष्ठित वकील असून जेडी व्हान्स यांच्याशी विवाहबद्ध आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात धार्मिक विविधता असूनही दोघेही परस्पर सन्मान आणि समजुतीने जीवन जगत आहेत. मात्र व्हान्स यांच्या या विधानामुळे अनेकांनी धर्मस्वातंत्र्य आणि धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी हे विधान वैयक्तिक श्रद्धेचा भाग मानला, तर काहींनी त्यावर टीका करत धार्मिक हस्तक्षेप असल्याचा आरोप केला.
या विधानामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी व्हान्स यांचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. अमेरिकेत धर्म आणि राजकारण यांचं नातं अतिशय संवेदनशील मानलं जातं आणि अशा विधानांमुळे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित होतात. काही विश्लेषकांच्या मते, हे विधान ख्रिश्चन मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय प्रयत्न असू शकतो.
जरी व्हान्स यांचं विधान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असलं, तरी त्याचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले आहेत. धर्म ही वैयक्तिक श्रद्धा असून त्यावर सार्वजनिक मंचावर भाष्य करताना संयम बाळगणं आवश्यक आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.