मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा आधुनिकतेकडे प्रवास…
नाशिक,दि.१ :- नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान अपेक्षित लाखो भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापन लक्षात घेता, नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी प्रवासी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area – PHA) उभारण्याच्या कामांना रेल्वे मंत्रालयाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या योजनेसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आता या प्रकल्पाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला असून दिवाळी २०२६ पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल.
देशातील ७६ स्टेशन्सपैकी एक असलेल्या नाशिकचा या प्रकल्पात समावेश झाला आहे. या निर्णयाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर देशातील प्रमुख स्थानकांवर प्रवासी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी, नाशिक मध्ये २०२७ साली होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता, मंत्री छगन भुजबळ यांनी दि. १७ मार्च २०२५ रोजी नाशिक रोड स्थानकावर PHA उभारणीसाठी औपचारिक मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने त्या प्रस्तावाला मान्यता देऊन देशातील ७६ प्रमुख स्थानकांमध्ये नाशिकचाही समावेश केला असून, हा आपल्या नाशिकसाठी एक मोठा सन्मान आहे.
मध्य रेल्वे मुख्यालय, मुंबई (CSMT) कडून नुकतेच प्राप्त झालेल्या पत्रानुसार, नाशिक रोडवर प्रत्येकी ५००० प्रवासी क्षमतेचा कायमस्वरूपी आणि २१०० चौ.मी. क्षमतेचा तात्पुरता (German Hanger Type) असा दोन प्रकारचा होल्डिंग एरिया उभारला जाणार आहे. हे कायमस्वरूपी होल्डिंग एरिया नाशिक मध्ये सर्वात व्यस्त कुंभमेळ्यात गर्दीचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ते सर्व प्रवाशांना सुरळीत प्रवास अनुभव सुनिश्चित करून प्री-बोर्डिंग आराम आणि कार्यक्षम गर्दी व्यवस्थापन उपलब्ध करेल. यामध्ये प्रवाशांसाठी बसण्याची सोय, ६५२ चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर बांधलेल्या स्वच्छ आणि प्रशस्त शौचालये, आरओ-आधारित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हाय-व्हॉल्यूम लो-स्पीड (HVLS) पंखे, तिकीट काऊंटर, माहिती फलक, पब्लिक ॲड्रेस सिस्टम, साहित्य स्कॅनर, साइनेज आणि AI आधारित निरीक्षण प्रणाली असणार आहे.
शिवाय, एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करून सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांद्वारे सतत देखरेख ठेवली जाईल. यात्री सुविधा केंद्रात वाट पाहणे पूर्णपणे मोफत असणार आहे. या निर्णयामुळे नाशिक रोड स्थानकाचे रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आधुनिकतेकडे मोठे पाऊल टाकत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ प्रवास सुनिश्चित होईल. गर्दी नियंत्रण, प्रवाशांची हालचाल, तसेच रेल्वे सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी हा उपक्रम निर्णायक ठरेल. तसेच हा प्रकल्प नाशिकच्या वाढत्या प्रतिष्ठेला साजेसा ठरेल आणि येत्या काळात शहराला राष्ट्रीय दर्जाच्या परिवहन व्यवस्थेचा केंद्रबिंदू बनणार आहे.