गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव “फिल्म बाजार – 2025”साठी दोन मराठी चित्रपट
मुंबई दि. ३०: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील “फिल्म बाजार” विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत दरवर्षी मराठी चित्रपटांची निवड करून ते पाठविण्यात येतात. यंदा “फिल्म बाजार – 2025” करिता संकेत माने दिग्दर्शित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि मिलिंद कवडे दिग्दर्शित श्री गणेशा या दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी गुरुवारी केली.
गेल्या दहा वर्षांपासून मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावे आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार व गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे.
निवड झालेल्या चित्रपटांचे फिल्म बाजारमध्ये स्क्रिनिंग करण्यात येते. तसेच महोत्सव कालावधीपर्यंत निवडक चित्रपट रसिकांना पूर्व नावनोंद करून चित्रपट पाहण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येते.त्याचबरोबर विविध परिसंवादामध्येही महामंडळाचा सक्रिय सहभाग असतो.
मुक्काम पोस्ट देवाचं घर चित्रपटाचा आशय :-

मुक्काम पोस्ट देवाचं घर हा संकेत माने दिग्दर्शित हृदयस्पर्शी चित्रपट आहे.
एका लहान मुलीची ही कथा आहे. तिचे वडील युद्धात शहीद झाल्यानंतर ती त्यांना “देवाचं घर” येथे पत्रं लिहू लागते. त्या पत्रांमधून तिचा वडिलांशी होणारा भावनिक संवाद, आई-आजीसोबतचे नाते आणि बालमनातील संवेदना अतिशय सुंदरपणे चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. हा चित्रपट प्रेम, विरह आणि आशेच्या भावनांवर आधारित आहे.
श्री गणेशा चित्रपटाचा आशय :-

श्री गणेशा हा मिलिंद कवडे दिग्दर्शित भावनिक कौटुंबिक चित्रपट आहे. कथानकात टिकल्या (प्रथमेश परब) आणि त्याचे वडील भाऊसाहेब पाटील (शशांक शेंडे) यांच्यातील तणावपूर्ण नाते आणि त्यांच्या नात्यातील समज, प्रेम आणि पुनर्मिलनाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. चित्रपट पित्याच्या जबाबदारीची जाणीव, मुलाच्या भावविश्वातील संघर्ष आणि आपुलकीचा शोध या विषयांवर आधारित आहे.ML/ML/MS