मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची विशेष बैठक संपन्न

 मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची विशेष बैठक संपन्न

मुंबई, दि २९
‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था’ ही मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळेच मुंबईच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचा विचार करताना इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसोबतच मोनो व मेट्रो रेल यांचाही समग्र व स्वतंत्र विचार करणे, अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापन अधिकाधिक प्रभावी होण्याकरिता मोनो व मेट्रो सेवा प्राधिकरणांनी त्यांच्या स्तरावरील आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडे सादर करावा, अशा सूचना मुंबई उपनगर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी केल्या. तर आपत्कालीन व्यवस्थापनाविषयी निर्धारित करण्यात आलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीचे नियमितपणे विश्लेषण करण्यासह सुसज्जता वेळोवेळी तपासण्याकरिता आपत्कालीन व्यवस्थापन कवायत अर्थात ‘मॉक ड्रिल’ नियमितपणे आयोजित करावी, अशा सूचना मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत.
..
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी चेंबूर येथील भक्तीपार्क नजीक तांत्रिक कारणास्तव मोनोरेल थांबून प्रवासी अडकल्याची घटना घडली होती. या घटनेच्या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांचा प्रतिसाद आणि सजगता याबाबतच्या तयारीचा आढावा घेणारी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२५) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांचे अध्यक्ष, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित उपायुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईचे श्री. रवी सिन्हा हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचबरोबर राज्य आपत्ती निवारण कक्ष, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, अदाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर, मुंबई पोलीस दल इत्यादींचे संबंधित अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
..
या बैठकीदरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या आपत्कालीन घटनांची संभाव्यता लक्षात घेऊन उद्भवलेली परिस्थिती सुयोग्यपणे हाताळण्यासाठी मोनो रेल्वे सह भुयारी मेट्रो रेल्वे सेवा व उन्नत मेट्रो रेल्वे सेवा पुरविणा-या संस्थांनी त्यांच्या स्तरावरील ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ आणि आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा यांच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणांकडे सादर करावा. तर मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. अश्विनी जोशी यांनी मोनोरेल, मेट्रो रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांच्या ठिकाणी नियमितपणे ‘मॉक ड्रिल’ घेण्याच्या सूचना केल्या.
..
मुंबई महानगरामध्ये वाहतुकीच्या वाढत्या साधनांसोबतच एखाद्या आपत्कालीन प्रसंगी यंत्रणांचा प्रतिसाद आणि सुसज्जता याबाबतची चाचपणी करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी बैठकीदरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून सांगितले. तर मुंबई आयआयटीचे प्राध्यापक डॉ. रवी सिन्हा यांनी दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी मोनोरेलविषयक आपत्कालीन परिस्थिती सुयोग्यरित्या हाताळल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपलिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल व बृहन्मुंबई महानगरपलिका प्रशासनाच्या सदर कार्याचे बैठकीदरम्यान कौतुक केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *