उद्यापासून 12 राज्यांमध्ये मतदार यादी फेर निरिक्षण सुरू
नवी दिल्ली, दि. २७ :
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून देशभरातील १२ राज्यांमध्ये SIR (विशेष सखोल फेरनिरीक्षण) करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. १२ राज्यांमध्ये SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होईल. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल. नवी मतदार जोडले जातील. सोबतच त्रुटी दूर केल्या जातील. या मध्ये सध्या महाराष्ट्राचा समावेश नाही.
या टप्प्यात समाविष्ट असलेले राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे — अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुडुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. या सर्व ठिकाणी निवडणूक आयोग मतदार यादींचे विशेष सखोल फेरनिरीक्षण करणार असून, नवीन मतदारांची नोंदणी, मृत व्यक्तींची वगळणी, तसेच पत्ता बदललेल्यांची अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, या यादीतील तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदार यादींची अचूकता आणि अद्ययावतता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे.
ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले की, आसाम राज्यातही २०२६ मध्ये निवडणुका होणार आहेत, मात्र तेथील मतदार यादी पुनरिक्षणाची घोषणा स्वतंत्रपणे केली जाईल. या विशेष सखोल फेरनिरीक्षण प्रक्रियेमुळे लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहनही आयोगाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत मतदार याद्यांमधील घोळ निस्तरण्याची मागणी केली होती. जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ संपत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली.
SL/ML/SL