पुर्व द्रुतगती महामार्गावरील झाडे तोडण्यास विरोध!
मुंबई, दि. २७. पूर्व द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्यासाठी ७०६ झाडे तोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून सर्व झाडांवर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. या निर्णयाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी विरोध केला आहे.
विकासाच्या नावाखाली मुंबईसह राज्यात बेसुमार झाडांची कत्तल सुरु आहे. परिणामी दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पर्यावरणाच्या बदलाचा फटाका हा मनुष्य जातीलाच नव्हे तर पशु पक्षांनाही बसत आहे. सुनामी, वादळ असो वा १२ ही महिने पडणारा पाऊस त्याचे परिणाम हवामान बदलावर होत आहेत. नव नविन आजारांचा सामना सर्वांनाच करावा लागत असून विकास करणा-यांवर त्याचा काही एक परिणाम होताना दिसून येत नाही. झाडांची कत्तल थांबायला तयार नाही.
दरम्यान, पुर्व द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्यासाठी ७०६ झाडांची कत्तल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्याला खासदार संजय दिना पाटील यांनी विरोध केला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या मुक्त मार्ग एलिव्हेटेड रस्त्याच्या विस्तारासाठी ७०६ झाडे तोडून त्याचे पुनर्रोपण करण्याचा वृक्ष प्राधिकरणाने निर्णय घेतला आहे. हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून हा निर्णय रद्द करण्याची मागणी खा. संजय दिना पाटील यांनी केली आहे. शिवाय झाडांचे पुनर्रोपन हे शंभर टक्के यशस्वी होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्यानंतर मुंबईच्या वाढलेल्या प्रदुषणात आणखीन भर पडण्याची शक्यता असल्याने पालिकेने झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करावा. अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. ML/ML/MS