यंदा कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बसेस…

 यंदा कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बसेस…

मुंबई दि २७ : यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळाने तब्बल ११५० जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे. या बसस्थानकावर १७ फलाट असून सुमारे १००० बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था या ठिकाणी आहे. तसेच सर्व एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय देखील या बसस्थानकामध्ये करण्यात आली आहे. प्रत्यक्ष यात्रे दिवशी एसटी बसेस मुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी चंद्रभागा बसस्थानकावर तब्बल १२० पेक्षा जास्त एसटी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

वाहन दुरुस्ती व देखभालीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या बाहेर मार्गस्थ बिघाड वाहने दुरुस्त करण्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. गरोदर माता, व स्तनदा मातांसाठी बसस्थानकावर हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

गाव ते पंढरपूर थेट सेवा..

यात्रा कालावधीमध्ये ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास आपल्या गावातून थेट पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या गट आरक्षणामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ५० टक्के व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास करण्याची सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी भाविक प्रवाशांनी येता -जाता आपल्या गावातून गट आरक्षण करावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मागिल वर्षी ६ कोटी रुपये उत्पन्न

मागील वर्षी कार्तिकी यात्रे मध्ये एसटीने तब्बल १०५५ जादा बसेस च्या माध्यमातून जवळजवळ ३ लाख ७२ हजार भाविक प्रवाशांची सुरक्षित ने -आण केली असून त्याद्वारे सुमारे ६ कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. यंदा देखील लाखो भाविक प्रवाशांची सुरक्षित ने – आण करण्यासाठी एसटीचे हजारो कर्मचारी रात्रंदिवस सेवेत तत्पर असतील अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *