वसई दिवा या मार्गावर लोकल वाहतूकीसाठी प्रयत्न
मुंबई, दि. २६ : वसई दिवा या मार्गावर आजमितीला लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. याच मार्गावर विरार वसई ते कर्जत कसारा आणि बोरीवली कर्जत कसारा लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी आपण निश्चितपणे रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्या कडे तातडीने करणार आहोत, असे निःसंदिग्ध आश्वासन बोरीवली चे आमदार संजय उपाध्याय यांनी आज दिले. १९७८ साली भिवंडी चे आमदार परशुराम टावरे यांनी विधिमंडळात दिवा वसई या मार्गावर लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी केली होती.
या मार्गावरुन आजमितीला अहमदाबाद ते दक्षिण व उत्तर भारतात लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. याच मार्गावर रामभाऊ नाईक यांनी ते खासदार असतांना वसई दिवा डिझेल मोटर युनिट (डीएमयु) शटल सेवा सुरु केली. या मार्गावरुन बोरीवली ते कर्जत कसारा आणि विरार वसई ते कर्जत कसारा लोकल वाहतूक वसई दिवा मार्गे सुरु केली तर विरार ते दादर आणि दादर ते कल्याण हा त्रिकोणी प्रवास वाचेल तसेच वेळ, पैसा आणि मेहनत यांचीही बचत होऊन प्रवाशांना दिलासा मिळू शकेल, अशी सूचना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी आमदार संजय उपाध्याय यांना केली. आपणांस ही सूचना शंभर टक्के मान्य असून प्रवाशांचे हित यामध्ये आहे. मी स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव यांच्याकडे मागणी करीन, अशी ग्वाही आमदार संजय उपाध्याय यांनी दिली.

दीपावली निमित्ताने संजय उपाध्याय यांनी आज उत्तर मुंबई परिसरातील पत्रकारांबरोबर स्नेहमीलन आयोजित केले होते. यावेळी आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या सोयीसाठी योगेश वसंत त्रिवेदी यांनी महत्त्वाची मागणी केली. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री असतांना ही मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी आपण येथून निवडून आलो आहोत त्या दिवसापासून या मतदारसंघासाठी अहोरात्र परिश्रम घेतले असून लवकरच अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागात पत्रकार भवन उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
यावेळी उत्तर मुंबई पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनायक घोडे, कोषाध्यक्ष रविंद्र राऊळ, सरचिटणीस प्रवीण वराडकर, सरचिटणीस नीलिमा जांगडा, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष विनोद यादव, गुजराती पत्रकार संघाचे अध्यक्ष कुनेश दवे, सरचिटणीस निमेश दवे, मयुर परीख, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य सुखदा (नेहा) पुरव यांना आमदार संजय उपाध्याय यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. माध्यम समन्वयक निरंजन शेट्टी, शाम कदम, प्रसिद्धी प्रमुख नीलाबेन सोनी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.ML/ML/MS