नांदेडच्या पवित्र गुरुद्वाराला तख्त स्नान
नांदेड दि २०:- नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारात दिवाळी अगोदर तखत स्नान म्हणजेच संपूर्ण गुरुद्वारा, दरबार साहिब आणि गुरु महाराजांचे शस्त्र ला पवित्र गोदावरीच्या पाण्याने स्नान घालण्यात येते. ही परंपरा शेकडो वर्षापासून पूर्वापार परंपरेने चालत आलेली आहे. पवित्र गुरुद्वाराची तख्त स्नान करण्याची संधी सामान्य भाविकांना मिळत असल्यामुळे देश विदेशातून भाविक ही सेवा आपल्या हातून व्हावी यासाठी येतात हे विशेष.

प्रथम गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी यांच्या उपस्थितीत विशेष अरदास करण्यात आल्यानंतर परंपरेप्रमाणे घागऱ्यासिंग यांची हस्ते गोदावरी नदीतून पहिली पाण्याची घागर भरून मिरवणूकीने हे पवित्र पाणी गुरुद्वारात आणण्यात येऊन तख्त स्नानाला सुरुवात होते. त्यांच्यानंतर हजारो भाविक आपल्या घागरी गोदावरीच्या पाण्याने भरून गुरुद्वारा ला तख्त स्नान घालतात. संपूर्ण गुरुद्वारा स्नान घालण्यात येऊन स्वच्छ करण्यात येते.
विशेष म्हणजे आजच्याच दिवशी गुरूमहाराजांचे सर्व शस्त्र स्वच्छ करून त्यांना धार ही लावण्यात येते. परंपरेप्रमाणे शिकलकरी बांधव शस्त्रांना धार लावण्याची सेवा करतात. या तख्त स्नान मध्ये लहान थोर, अबाल वृद्ध, महिला सर्व सहभागी होतात. गुरुद्वाराच्या प्रमुख उत्सवापैकी तख्त स्नान हा एक महत्वपूर्ण उत्सव म्हणून ओळखला जातो.ML/ML/MS