सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही

 सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही

मुंबई दि.१६ : दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, सर्व सेल आणि विभागांचे प्रभारी व माननीय आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा आणि वोट चोरीचा सविस्तर अहवाल सादर केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, राज्यभरातील मतदार याद्यांमधील घोळ, अवैध पद्धतीने मतदारांची झालेली वाढ व दुबार नावं या सर्व तांत्रिक बाबी आणि विशेषत: कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदारांची झालेली शंकास्पद वाढीचा PPT च्या माध्यमातून उलगडा केला आणि राज्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर पुराव्यांसहित प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असतानाही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देवांग दवे यांच्याकडे आयोगाच्या वेबसाईटचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आयोगावर विश्वास राहिलेला नाही,असे रोहित पवार म्हणाले.

एका संकेतस्थळावरून १२३४५६७८९०१२ या क्रमांकाचे आधार कार्ड काढण्यात आले. त्यावर डोनाल्ड ट्रम्प तात्या हे नाव, फेटा घातलेला ट्रम्प यांचा फोटो, घर क्रमांक – ००७, गल्ली – पांढरा बंगला, गाव – राशीन, जन्मतारीख – १८२५, लिंग – स्त्री आदी अशी माहिती या संकेतस्थळावर भरण्यात आली होती. त्यानंतर अर्ज फी ऑनलाईन २० रुपये भरल्यानंतर ट्रम्प यांचे आधार कार्ड तयार झाले. याच आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी केली जाते. अशाचप्रकारे बोगस आधार कार्डच्या आधारे अधिकारी डोळेझाकपणे नोंदणी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.

पवार म्हणाले की, केवळ घरचा पत्ता बदलून तीनदा मतदारयादीत नावे आली. एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱया ठिकाणी पुरूष म्हणून नोंदणी करण्यात आल्याचे पुरावे रोहित पवारांनी दाखवले. मतदारयादीत असे अनेक घोळ असल्याचे पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकशाहीचा गळा दाबला जाणार असेल तर, ते आम्हाला मान्य नाही. मतदार याद्यांमध्ये जर असे घोळ असतील तर निवडणुका कशासाठी घेता?निवडणूक आयोगाची वेबसाईट हँडल करण्याची जबाबदारी दवे यांच्याकडे दिली गेली. आमच्याआधी दवेकडे सगळी माहित होती. काय घालायचे, डिलीट करायचे काम दवेंनी उमेदवारांना हाताशी धरून केले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने मतदारवाढीचे विश्लेषण, क्रॉफ व्हेरिफिकेशन केले असल्यास त्याची माहिती, वाढलेल्या मतदारांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली आहे व हा विषय राज्यभरातील जनतेला पटवून देण्यासाठी आम्ही भविष्यात काम करणार असेही रोहित पवार यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आयोगास असलेल्या मागण्या पुढील प्रमाणे

  1. मतदारवाढीचे विश्लेषण देणे:
    लोकसभा निवडणूक २०२४ व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ यांच्या दरम्यान वाढलेले मतदार कुठून व कोणत्या पद्धतीने नोंदवले गेले, याची BLO डायरीनुसार सविस्तर माहिती द्यावी.
  2. अचानक वाढलेले मतदार:
    विधानसभा २०२४ रिवाइज यादीनंतर (३१ ऑगस्टनंतर) हरकतींचा कालावधी संपल्यानंतर शेवटच्या महिन्यात प्रत्येक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदारवाढीचे कारण लेखी स्वरूपात स्पष्ट करावे.
  3. डेटा उपलब्धता:
    विधानसभा निवडणूक २०२४ पासून १ जुलै २०२५ पर्यंत किती मतदारांची नोंद झाली आणि किती नावे वगळली गेली, याचा अधिकृत डेटा व त्याच्या फोटो कॉपीसह प्रदान करण्यात यावा.
  4. डिजिटल मतदारयाद्या:
    सर्व अद्ययावत मतदार याद्या फोटोसह, डिजिटली रीडेबल स्वरूपात उपलब्ध करून द्याव्यात.
  5. BLO डायरी नोंदी:
    BLO डायरीतील सर्व नोंदी अधिकृत राजकीय पक्षांना निरीक्षणासाठी उपलब्ध करून द्याव्यात.
  6. BLO लॉगिन डेटा:
    BLO लॉगिनद्वारे कोणत्या उपकरणांवरून (IP ऍड्रेस), कोणत्या लोकेशनवरून, किती नवीन मतदार नोंदणी व बल्क डिलीशन करण्यात आले, याची माहिती पारदर्शकतेसाठी प्रदान करण्यात यावी.
  7. मतदानाच्या दिवसाचे CCTV फुटेज:
    मतदान केंद्रांवरील CCTV फुटेज सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध करण्यात यावे.
    प्रायव्हसीचे कारण देऊ नये.
    मतदान केंद्रांवरील सेल्फी पॉईंट्स मतदारांच्या गोपनीयतेवर परिणाम करत नाही का, याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
  8. फॉर्म क्रमांक 17A उपलब्ध करून देणे:
    मतदान केलेल्या मतदारांची नोंद असलेला फॉर्म क्रमांक 17A राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावा.
  9. स्थानिक निवडणुकीतील पारदर्शकता (VVPAT):
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये VVPAT मशीनचा वापर अनिवार्य करण्यात यावा.
    आयोगास आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसेल, तर मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपरवर) निवडणुका घेण्यात याव्यात. ML/ML/MS

.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *