सोने पुरवठादाराचा “सोनेरी प्रवास” संपला, बॅगेतून ३.२७ कोटींचे दागिने जप्त…

गोंदिया दि १६ :- बिलासपूर ते नागपूर प्रवास करणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस मधील स्लीपर कोच एस-६ मध्ये कर्मचारी नियमित गस्त घालत होते. आमगाव आणि गोंदिया दरम्यान, त्यांना एक संशयास्पद प्रवासी दिसला अस्वस्थ, वारंवार इकडे तिकडे पाहणारा आणि त्याच्या बॅगेवर घट्ट पकड असलेला. यामुळे संशय निर्माण झाला आणि कर्मचाऱ्यांनी त्याचे सामान तपासण्यास सुरुवात केली.
त्या बागेमधून सोन्याच्या साखळ्या, बांगड्या, नाणी, सोन्याचे बिस्किटे, दागिन्यांचे सेट आणि ७.५ किलो चांदी सापडली, त्यामुळे एकूण ३ कोटी २७ लाख रुपये किमतीचा ‘सोन्याचा साठा’ सापडला. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव नरेश पंजवानी असल्याचे सांगितले आणि तो गोंदियाच्या सराफा बाजारात सोन्याचा पुरवठा करतो, परंतु पोलिसांनी कागदपत्रे मागितली तेव्हा त्याच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते. ही सामग्री कुठून आली, ती कुठे पाठवली जाणार होती आणि त्यामागे कोणते नेटवर्क सक्रिय आहे याचा शोध आता रेल्वे पोलिस घेत आहेत.ML/ML/MS