या शहरात दिवसातून फक्त 2 तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी

जपानमधील टोयोआके शहराने एक अभिनव आणि धाडसी पाऊल उचलत नागरिकांना स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांचा वापर दिवसातून केवळ दोन तासांपुरता मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे. हा ठराव कायदेशीर बंधनकारक नसला तरी, तो सामाजिक जनजागृतीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे वाढत्या डिजिटल व्यसनामुळे होणाऱ्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक परिणामांपासून नागरिकांचे संरक्षण करणे. विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये स्क्रीनच्या अतिवापरामुळे निद्रानाश, एकाग्रतेचा अभाव, डोळ्यांचे त्रास आणि एकटेपणा यांसारख्या समस्या वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टोयोआके शहराच्या नगरपालिकेने पालकांना घरगुती नियम बनवण्याचे आवाहन केले असून, शाळा आणि स्थानिक समुदाय केंद्रांमध्ये डिजिटल संतुलनावर आधारित कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्रत्यक्ष संवाद वाढावा, कौटुंबिक नातेसंबंध मजबूत व्हावेत आणि तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयावर देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी याचे स्वागत केले आहे, तर काहींनी याला अतिनियंत्रण म्हणत टीका केली आहे. तरीही, टोयोआके शहराचा हा प्रयोग भविष्यात इतर शहरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो आणि डिजिटल आरोग्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे.
टोकीयो, दि. १५ :
smartphone usage is only allowed for 2 hours a day
SL/ML/SL 15 Oct. 2025