काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार…

पालघर दि १४ : वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर आज उत्साहात संपन्न झाले. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे निवृत्त उपकुलसचिव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास केशवराव औताडे तसेच कॅप्टन निलेश पेंढारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर शिबिराधीपती रविंद्र म्हसकर यांनी शिबिरार्थीना सेवादलाची कार्यप्रणाली यावर अतिशय सविस्तर प्रशिक्षण दिले. संध्याकाळी शिबिराथींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराच्या स्थळापासून मर्सिस, मुक्ताअळी, दिघोळे, घरतवाडी, होळी भाजी मार्केट, तरकड ग्रामपंचायत, आकटण, वासळई या भागांतून आणि गावातून संविधान सन्मान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली.
तरखड ग्रामपंचायतच्या उपसरपंच सुनीता लिमॉस यांनी मान्यवरांचे आणि पदयात्रेचे स्वागत केले, याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदयात्रेत सहभागी झाले होते. प्रभातफेरी नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष आशितोष शिर्के यांनी “मजबुतीका का नाम गांधी” या विषयावर अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले तसेच राजेंद्र भिसे यांनी देखील “आजची राजकीय आव्हाने आणि सेवादलाच्या महत्वाची भूमिका” या विषयावर सुरेख मार्गदर्शन केले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेवादलात नवीन कार्यकर्ते तयार होऊन त्यांनी संविधान बचाव आणि सन्मानाचा विचार घेऊन गावोगावी आणि घरोघरी जावे लागेल याशिवाय काँग्रेस पक्ष निर्मितीचा इतिहास ते विद्यमान परस्थितीत सेवादलाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी यावर अतिशय चिंतनशील मनोगत व्यक्त केले.
शिबिरार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आणि राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी प्रकाश पेवेकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल, मोहन घरत, डॉमिनिक डिमेलो, रुपेश रॉड्रिक, प्रिन्स्ली घोंसाविस, सुनील यादव, किरण शिंदे आदी मान्यवरांची आणि शिबिरार्थींची उपस्थिती होती.ML/ML/MS