सणवार आणि लग्नसराईमुळे देशात होणार ७ हजार कोटींची उलाढाल

जयपूर, १४ : भारतात सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात आणि आगामी लग्नसराईमुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह आणि खरेदीचा जोर दिसून येत आहे. भारतीय उद्योग व्यापारी मंडळ (BUVM) या राष्ट्रीय व्यापारी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सणासुदीच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये मिळून एकूण ₹७.५८ लाख कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
BUVM चे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूलाल गुप्ता यांनी सांगितले की, दसरा, दिवाळी, धनत्रयोदशी, छठ आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा उत्साह वाढलेला आहे. देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी आणि खर्च करण्याची तयारी यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षीच्या व्यापार वृद्धीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी केलेले स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहनही एक महत्त्वाचा घटक ठरले आहे. या आवाहनानंतर देशभरात स्वदेशी वस्तूंच्या प्रचाराला गती मिळाली असून, व्यापारीही भारतीय उत्पादने प्राधान्याने विक्रीस ठेवत आहेत.
याशिवाय, वस्तू आणि सेवा कर (GST) सुधारणा, ग्राहकांचा वाढता आत्मविश्वास आणि डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर यामुळेही बाजारपेठांमध्ये तेजी आली आहे. BUVM ने देशभरातील प्रमुख शहरांतील व्यापारी नेत्यांचा समावेश असलेल्या समितीमार्फत एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणावर आधारित अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात मुंबई, दिल्ली, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद यांसारख्या शहरांतील बाजारपेठांचा अभ्यास करण्यात आला होता.
या सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, दागिने, घरगुती उपकरणे, सजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि पर्यटन क्षेत्रात विशेषतः मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे हॉटेल्स, केटरिंग, फॅशन, फोटोग्राफी आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांसारख्या सेवा क्षेत्रांनाही मोठा फायदा होणार आहे.
या सर्व घडामोडी देशाच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी सकारात्मक संकेत मानले जात आहेत. व्यापारी वर्गाला आशा आहे की, सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या या काळात मिळणारा हा आर्थिक बूस्टर पुढील आर्थिक वर्षासाठीही बाजारपेठेला बळकटी देईल.
SL/ML/SL 14 Oct. 2025