अतिवृष्टीग्रस्तांसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची मदत

मुंबई दि १४ : “अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, घरे, जनावरे आणि जगण्याची साधनं उद्ध्वस्त झाली आहेत. अशा काळात समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारी स्वीकारून मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दाखवलेला हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श केवळ प्रेरणादायी नाही, तर सहकार चळवळीच्या ‘सामूहिक कल्याण’ या तत्वाला खऱ्या अर्थाने न्याय देणारा आहे. पीडीसीसी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहकार क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.” अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यंदा राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.आज उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रालय येथे सुपूर्त करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे ही उपस्थित होते.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ कोटी, कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार २५ लाख ५१ हजार रुपये आणि संचालक मंडळाचा सभाभत्ता १ लाख रुपये असे एकूण १ कोटी २६ लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याआधीही विविध आपत्तीच्या काळात सामाजिक जबाबदारी जपत मदतीचे कार्य केले आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू केल्या आहेत.”
यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे , उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक भालचंद्र जगताप, विकास दांगट, सुरेश घुले, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, संचालिका निर्मलाताई जागडे, पूजा बुट्टे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य व्यवस्थापक समीर रजपूत, सेवक संघाचे प्रतिनिधी अजित जाधवराव, युनियन प्रतिनिधी संजय पायगुडे, रविंद्र जोशी, तसेच माजी आमदार व संचालक दिलीप मोहिते, अतुल साळुंखे (खाजगी सहाय्यक) आणि सेवक संचालक राजेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS