मीरा – भाईंदर महानगरपालिकेत मराठीतच कामकाज अनिवार्य, सरनाईकांचा आग्रह

मीरा-भाईंदर दि १३ : मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला असला तरी मीरा -भाईंदर महानगरपालिकेतील शासकीय कामकाज हे इंग्रजी भाषेत होत असल्याचे आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अवमान महानगरपालिका करत असल्याची बातमी एका वृत्तपत्रातून छापण्यात आली होती. या बातमीवर ठोस भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आता मीरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्तांना पत्र देत महानगरपालिकेतून होणारे सर्व प्रशासकीय कामकाज, पत्रव्यवहार, नागरिक सेवा आणि माहिती फलक मराठीतच होणे बंधनकारक असल्याच्या सूचना दिल्या आहेत.
“मराठी राजभाषेला पर्याय नाही – आता ठाम अंमलबजावणी !”
- मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील सर्व विभागीय पत्रव्यवहार मराठीतच होईल.
- नागरिक सेवा केंद्र, कर विभाग, शिक्षण, आरोग्य यांसारख्या सर्व क्षेत्रातील व्यवहार मराठीत उपलब्ध केले जातील.
- सर्व सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक आणि नागरिकांशी संवाद मराठीतच साधला जाईल.
- मराठी भाषेचा वापर टाळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल.
यासंदर्भात बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की,
“मराठी ही आपली मायबोली, आपली अस्मिता आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या भूमीत जन्म घेऊनही आपल्या भाषेला दुय्यम स्थान देणे सहन केले जाणार नाही. मराठी राजभाषेच्या सन्मानासाठी शासन ठाम आहे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका आता मराठीच्या अंमलबजावणीत आदर्श ठरेल. नागरिकांना प्रत्येक सेवा मराठीत मिळणे हा त्यांचा हक्क असून शासन त्या हक्कासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रात मराठीला वावडे नाही आणि आता हेच प्रत्यक्षात उतरवले जाईल. ”ML/ML/MS