पदाचा गैरवापर करीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेची मदत

मुंबई, दि. १3 – घाटकोपर येथील कचरा पेटी हटविण्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला असून बांधकाम व्यवसायिकाला फायदा मिळावा म्हणुन पालिकेचे अधिकारी नियमांचे उल्लंघन करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्तांकडे खा. संजय दिना पाटील यांनी तक्रार केली आहे.

घाटकोपर येथील पालिकेच्या एन विभागीय कार्यालयाच्या मागे एका इमारती बाहेर असलेली कचरा पेटी पालिकेच्या अधिका-यांनी स्थानिक नागरीकांना कोणतीही पुर्वसुचना न देता इतरत्र हलविली. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांना तसेच फेरीवाल्यांना कचरा टाकण्यास सोय नसल्याने त्यांनी खा. संजय दिना पाटील यांच्याकडे तक्रार करुन कचरा पेटी पुर्ववत करण्याची विनंती केली. या कचरा पेटी समोर विकसीत होत असलेल्या इमारतीचा गेट येत असल्याने घन कचरा व्यवस्थापन विभागातील अधिका-यांनी बांधकाम व्यवसायिकाला मदत करण्याच्या हेतूने कचरा पेटी हटवून मुख्य रस्त्यावर ठेवली. असा आरोप स्थानिक नागरीक व फेरीवाल्यांनी केला आहे. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खा. संजय दिना पाटील यांनी पालिका अधिका-यांच्या या कृती बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून घन कचरा विभागाच्या अधिका-यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत बांधकाम व्यवसायिकाला मदत केली म्हणुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एका पत्राव्दारे केली आहे. त्यामुळे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून पालिका अधिका-यांनी कचरा पेटी पुर्ववत ठिकाणी आणुन ठेवली.
दरम्यान दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत बांधकाम व्यवसायिकाला मदत केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मनपा अधिनियम १८८८ कलम ३९८,४०३,३६७ अन्वये तसेच बृहन्मुंबई महापालिका सेवा (शिस्त व अपिल) नियम २०१५ नुसार कारवाई करण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या आहेत.ML/ML/MS