सचिनने लाँच केला स्वत:चा स्पोर्ट्स-ब्रँड – TENXYOU

मुंबई, दि. १० : सचिन तेंडुलकर आता फिटनेसच्या मैदानात उतरला आहे. त्यांने ‘TEN X YOU’ नावाचा स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड लाँच केला असून, भारताला ‘खेळ प्रेमी देश’ ऐवजी ‘खेळ खेळणारा देश’ बनवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.आज मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये सचिन तेंडुलकर यांनी ‘TEN X YOU’ या ब्रँडचे भव्य उद्घाटन केले. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी अंजली, मुलगी सारा, माजी क्रिकेटपटू प्रविण आमरे आणि बीसीसीआयचे मुख्य निवड समिती प्रमुख अजित आगरकर उपस्थित होते. ‘TEN X YOU’ हा ब्रँड SRT10 Athleisure Pvt. Ltd अंतर्गत तयार करण्यात आला असून, सचिन यांच्यासोबत कार्तिक गुरुमूर्ती आणि करण अरोरा हे सह-संस्थापक आहेत.
सचिन म्हणाला, “खेळामुळे मला शिस्त, उद्देश आणि आनंद मिळाला. आता मी भारतासाठी वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. माझी इच्छा आहे की भारतातील प्रत्येक व्यक्तीने खेळाचा अनुभव घ्यावा.” त्यांनी स्पष्ट केले की हा ब्रँड केवळ व्यावसायिक खेळाडूंसाठी नाही, तर सामान्य नागरिकांसाठीही आहे. या ब्रँडमध्ये फुटवेअर, अॅपरेल आणि क्रिकेटसाठी खास उत्पादने उपलब्ध असतील. क्रिकेट शूज ₹९,००० पर्यंतच्या किंमतीत तर सामान्य अॅपरेल ₹१,२०० ते ₹१,८०० दरम्यान उपलब्ध असतील.
ब्रँडची सुरुवात डिजिटल-फर्स्ट मॉडेलने झाली असून, पुढील सहा महिन्यांत ऑफलाइन स्टोअर्स सुरू करण्याची योजना आहे. TEN X YOU क्रिकेट अकॅडम्यांशी भागीदारी करत असून, तिथे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या उत्पादनांची उपलब्धता दिली जाणार आहे. याशिवाय, पिकलबॉल आणि ट्रेनिंग गिअरसारख्या इतर खेळांमध्येही विस्तार करण्याचा विचार आहे.
सचिनने त्यांच्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनुभवलेल्या कमतरता लक्षात घेऊन या ब्रँडची रचना केली आहे. त्यांनी सांगितले की, “भारतीय पायांची रचना, हवामान आणि शरीराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन उत्पादने तयार केली आहेत.” विशेष म्हणजे, भारतीय खेळपट्ट्यांवर अधिक पकड मिळवण्यासाठी सचिनने स्वतः डिझाइन केलेले एक्स्ट्रा स्पाइक फीचरही शूजमध्ये समाविष्ट आहे.
या ब्रँडच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर भारतात फिटनेस संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते, भारतात तरुणांची संख्या जास्त आहे, पण आपण फिट आणि आरोग्यदायी आहोत का, याचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ आहे. त्यामुळे त्यांनी ‘TEN X YOU’ च्या माध्यमातून देशाला खेळाकडे वळवण्याचा संकल्प केला आहे.
SL/ML/SL 10 Oct. 2025