घोडबंदरमधील RMC प्लांटवर MPCB ची कारवाई — तत्काळ बंदीचा आदेश जारी

मीरा-भाईंदर दि १०: मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर परिसरात चालणाऱ्या रेडी मिक्स कॉंक्रिट (RMC) प्लांटविरुद्ध परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचाशी केलेल्या अधिकृत पत्र व्यवहारनंतर MPCB तर्फे सखोल चौकशी करण्यात आली. आता यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर कारवाई करत तत्काळ बंदीचा आदेश जारी केला आहे.
या प्लांटमधून गंभीर स्वरूपाचे वायू व ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती.
9 सप्टेंबर 2025 रोजी घोडबंदर गावातील नागरिकांकडून RMC प्लांटमुळे होत असलेल्या धूळ व वायूप्रदूषणाबाबत मंडळाकडे तक्रार दाखल झाली. 11 सप्टेंबर रोजी MPCB च्या अधिकाऱ्यांनी स्थळाची पाहणी केली असता गंभीर त्रुटी आढळल्या. तपास अहवालानुसार RMC मिक्सिंग प्लांट झाकलेला नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत होती. तसेच साठवण व कार्यक्षेत्रात पाणी शिंपडण्याची कोणतीही सोय नव्हती. नियमानुसार 30 फूट उंच बॅरिकेडऐवजी फक्त 10 फूट टिनची भिंत उभारण्यात आली होती. तसेच ट्रान्झिट मिक्सर वाहनांसाठी टायर वॉशिंग सुविधा नव्हती आणि ना हि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन (काँक्रीट पिट) उपलब्ध होते.
त्याचसोबत वायू गुणवत्तेचे निरीक्षण यंत्र देखील
(CAAQMS) MPCB सर्व्हरशी जोडलेले नव्हते. या सर्व त्रुटींमुळे परिसरात धूळ आणि वायूप्रदूषण वाढून नागरिकांना गंभीर आरोग्य धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दीर्घकाळापासून या RMC प्लांटमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवला होता. धूळकण, रासायनिक प्रदूषण व मोठ्या आवाजामुळे श्वसनाचे आजार, अॅलर्जी, दमा, तसेच मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले रसायनांमुळे भूमिगत पाणी आणि माती दूषित होत असल्याने शेतजमिनींचे नुकसान व परिसरातील झाडे-झुडपांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
MPCB ने ही कारवाई खालील कायद्यांअंतर्गत केली आहे.
१. पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1974 चे कलम 33A
२. हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1981 चे कलम 31A
३. धोकादायक व इतर कचरा (व्यवस्थापन व सीमा पार हालचाल) नियम, 2016
या कायद्यांच्या अधीन राहून संबंधित RMC युनिटविरुद्ध तत्काळ बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
तसेच, संबंधित विभागांना वीज व पाणीपुरवठा तातडीने खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास पर्यावरणीय कायद्यांनुसार पुढील दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा MPCB ने दिला आहे.
मीरा-भाईंदर परिसरातील खालील सहा RMC प्लांटविरुद्ध नागरिकांकडून सतत तक्रारी होत होत्या:
१. लाईम स्टोन – सर्वे नंबर ८, घोडबंदर रोड
२. ग्रास सिमेंट्स – सर्वे नंबर ६/३, घोडबंदर रोड
३. सोनम बिल्डर्स – सर्वे नंबर ८, घोडबंदर रोड .
- हिरकॉन इन्फ्रा – १४/4, चिंचबा देवी मंदिर समोर, घोडबंदर गावं, काशिमिरा
५. राज ट्रान्सिट इन्फ्रा प्रा.ली. – शेड नंबर ३२, तळमजला, डी.एस. पटेल कंपाऊंड
६. जे.व्ही.आय. अॅडवान्स टेक्निकल एल.एल.पी. _ घोडबंदर रोड
या सर्व प्लांटमधून पर्यावरणीय हानी होत असल्याचे नमूद करत, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून नागरिकांनी थेट राज्य सरकारकडे तक्रार केली होती. MPCB च्या कारवाईनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, “ही फक्त सुरुवात आहे. प्रदूषण करणाऱ्या सर्व युनिट्सविरुद्ध कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई महत्वाची ठरल्याचे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात बोलताना मंत्री सरनाईक म्हणतात की,,
“मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कुठलाही तडजोड होऊ देणार नाही. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी मी स्वतः पर्यावरण तथा बतावर्ण बदल मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्याकडे पाठविल्या होत्या. त्यानंतर MPCB तर्फे तपासणी करून गंभीर त्रुटी उघडकीस आल्या व तत्काळ बंदीचा आदेश देण्यात आला. ही कारवाई फक्त सुरुवात आहे. शहरातील सर्व प्रदूषण करणाऱ्या युनिट्सवर कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी ही लढाई सातत्याने सुरू राहील.”ML/ML/MS