ऐरोलीतील विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

मुंबई, दि ९
ऐरोलीतील श्रीमती सुशीला देवी देशमुख विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी अनुष्का केवळे या विद्यार्थिनीच्या बेंच खाली कॉपी सदृश्य चिट्टी सापडल्यामुळे शाळेतील देशमुख नामक शिक्षिकेने तुम्ही झोपडपट्टी तील मुली अशाच असतात अश्या प्रकारचे वक्तव्य करून अनुष्का हिला अनेक विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. त्यामुळे अनुष्काने शिक्षकांकडून झालेल्या अपमानास्पद त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वर्गात अत्यंत हुशार असणाऱ्या विद्यार्थिनीच्या बेंच खाली कॉपी सापडल्यानंतर कोणतीही शहानिशा न करता या विद्यार्थिनीला अपमानित करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकेवर तसेच या शिक्षिकेला पाठीशी घालणाऱ्या शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉ. रामदास आठवले यांनी केली. महेंद्र नगर, नौसील येथील अनुष्काच्या निवासस्थानी भेट देऊन तिच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
या भेटीप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओहोळ, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, सरचिटणीस एल. आर. गायकवाड, कार्याध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष टिळक जाधव, युवक अध्यक्ष ऍड. यशपाल ओहोळ, जिल्हा प्रवक्ते सचिन कटारे, सुभाष भोळे, प्रतीक जाधव, महेश कांबळे, सागर सोनकांबळे, अभिमान जगताप, महेश लंकेश्वर, शशिकला जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शिलाताई बोदडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाने या घटनेची न्याय्य चौकशी करून जबाबदार शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.KK/ML/MS