या भागात उभारली जाणार चौथी मुंबई, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. 8 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’ उभारण्याची मोठी घोषणा केली असून, महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळा जवळ तिसरी मुंबई तर वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई उभारण्याची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री म्हणाले, “नवी मुंबई विमानतळाच्या शेजारी तिसरी मुंबई उभी राहील आणि वाढवण बंदर परिसरात चौथी मुंबई उभारली जाईल, असा मला विश्वास आहे.” त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे आभार मानले आणि सांगितले की, “मोदींनी दिलेला हा उपहार आहे. त्या ठिकाणी देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळ सुरू करत आहोत. हे प्रकल्प महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे ठरतील.”
“हे विमानतळ नवं भारताचं प्रतिक आहे. या विमानतळाची संकल्पना 1990 च्या दशकातील होती. आम्ही पुण्याहून मुंबईला जायचो तेव्हा आंतरराष्ट्रीय विमातनळ होणार असा बोर्ड पाहायचो. पण काहीच व्हायचं नाही. मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं, तेव्हा आम्ही विनंती केली की प्रोजेक्टमध्ये नवी मुंबई विमानतळ घ्यावं. मोदींनी प्रगतीच्या अंतर्गत हे विमानतळ घेतल्यानंतर निर्मितीसाठी 8 एनओसी मिळत नव्हत्या. पण मोदींनी पहिली बैठक घेतली तोपर्यंत 7 एनओसी आल्याचं सचिवांनी सांगितलं. 15 व्या दिवशी आठवी एनओसी आली. जे 10 वर्षं झालं नव्हतं ते मोदींच्या एका बैठकीने झालं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“9 कोटी प्रवाशांना हे विमानतळ हाताळू शकतं. हे विमानतळं इंजिनिअरिंचा करिश्मा आहे. हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र, भारताच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हे विमातनळ महाराष्ट्राचा जीडीपी 1 टक्क्याने वाढवण्याची क्षमता ठेवतो. यातून महाराष्ट्र पुढे जाणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“हे पहिलं विमानतळ असेल ज्याला वॉटर टॅक्सीही मिळणार आहे. म्हणजे येथील वॉटर टॅक्सीत बसून थेट गेट वे ऑफ इंडियाला जाता येईल. कोणतंही ट्राफिक लागणार नाही. अशी व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
SL/ML/SL 8 Oct. 2025