महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचा स्वदेशी महोत्सव

पुणे दि. ६ः महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने दिनांक ९ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पुणे येथे खादी व कुटिरोद्योगातून तयार झालेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन (स्वदेशी महोत्सव) योजण्यात आले आहे. पुणे येथील पूना गोअन इन्स्टिट्यूट, न्यू नाना पेठ येथील सभागृहात गुरुवार, दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा) यांच्या शुभहस्ते व मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से) यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केलेल्या स्वदेशी वस्तूंच्या वापराबद्दलच्या आवाहनास अनुसरुन खादी व ग्रामोद्योग मंडळाने हे प्रदर्शन योजले आहे. या प्रदर्शनात खादीचे कुर्ते, साड्या, अन्य कपडे, मध व त्यापासून बनविलेल्या विविध वस्तू तसेच ग्रामोद्योगातून तयार झालेले विविध मसाले, पापड-लोणचे, कोल्हापूरी चप्पल, तसेच पारंपारिक हाताने तयार केलेल्या चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ व कंदील, ऑर्गेनिक साबण-तेल, वनऔषधे, लोकर पासून तयार केलेली घोंगडी इत्यादी वस्तूंचे स्टॉल असणार आहेत.
सुमारे आठवडाभर चालणारे हे प्रदर्शन रोज सकाळी ११.०० ते रात्री ८.०० वाजे पर्यंत पुणेकरांसाठी खुले असणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देऊन ग्रामोद्योगातून तयार झालेल्या वस्तू विकत घ्याव्यात व ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी सुधीर केंजळे (जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, पुणे) दूरध्वनी क्रं. ८२९१९१६६५ यांच्याशी संपर्क साधावा.
ML/ML/SL 6 Oct. 2025