Nobel 2025 – वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर

 Nobel 2025 – वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम, दि. ६ : नोबेल पुरस्कार 2025 मध्ये वैद्यकशास्त्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मेरी ई. ब्रन्को, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन सकागुची यांना प्रदान करण्यात आला आहे. स्टॉकहोममधील करोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या घोषणेनुसार, या तिघांनी परिधीय प्रतिकारशक्ती सहनशीलते (Peripheral Immune Tolerance) विषयावर केलेल्या मूलभूत संशोधनासाठी हा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे शरीरातील टी-रेग्युलेटरी पेशी (Treg cells) ओळखण्यात यश आले, ज्या पेशी शरीराच्या प्रतिकारशक्तीला नियंत्रित करतात आणि स्वतःच्या ऊतींवर हल्ला होण्यापासून वाचवतात. हे संशोधन ऑटोइम्यून आजार, कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर वैद्यकीय समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरले आहे.

जपानमधील शिमोन सकागुची यांनी 1995 मध्ये टी-रेग पेशींचा शोध लावला होता. त्यांनी 1979 पासून या विषयावर संशोधन सुरू केले होते. सध्या ते ओसाका विद्यापीठात कार्यरत आहेत.

अमेरिकेतील मेरी ब्रन्को या प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. असून त्या सिएटलमधील ‘इन्स्टिट्यूट फॉर सिस्टिम्स बायोलॉजी’मध्ये वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

फ्रेड राम्सडेल हे ‘सोनोमा बायोथेरप्युटिक्स’मध्ये सल्लागार असून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस येथून इम्युनोलॉजीमध्ये पीएच.डी. प्राप्त केली आहे.

या संशोधनामुळे प्रतिकारशक्तीचे कार्य अधिक स्पष्ट झाले आहे. शरीरातील टी पेशी विविध प्रकारच्या सूक्ष्मजंतूंशी लढा देतात, पण काही वेळा त्या स्वतःच्या ऊतींवरही हल्ला करतात. टी-रेग पेशी या चुकीच्या हल्ल्यांना थांबवतात आणि प्रतिकारशक्तीला संतुलित ठेवतात. या संशोधनामुळे भविष्यात कर्करोगावरील उपचार, ऑटोइम्यून रोगांचे नियंत्रण आणि अवयव प्रत्यारोपणानंतरच्या गुंतागुंती टाळण्याच्या दृष्टीने नवे मार्ग खुले झाले आहेत.

नोबेल पुरस्कार विजेत्यांना सुवर्ण पदक, डिप्लोमा आणि 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 1 मिलियन अमेरिकन डॉलर) इतकी रोख रक्कम दिली जाते. नोबेल पुरस्कार वितरण समारंभ 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्टॉकहोम येथे पार पडतो.

SL/ML/SL 6 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *