नाशिक कुंभमेळ्यासाठी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पना

मुंबई, दि. ६ : प्रयागराज येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 सुरक्षित पार पाडण्यासाठी नाशिक प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोट्यवधी भाविकांचे आगमन लक्षात घेऊन गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनासाठी महापालिका आणि शहर पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
या आराखड्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे, संपूर्ण शहरात तब्बल 2,500 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
गुगल आणि मोबाईल लोकेशनचा आधार
कुंभमेळ्यातील गर्दीचे रियल-टाइम नियमन करण्यासाठी प्रशासनाने थेट गुगलसोबत बैठक घेऊन सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या मोबाईल लोकेशन (Mobile Location) आणि गुगल मॅप्सच्या मदतीने गर्दीची अचूक घनता मोजली जाईल.
या माहितीचा वापर करून, अधिक गर्दी वाढल्यास ‘क्राऊड अलर्ट’ सुविधा मोबाईल ॲप्समध्ये दिली जाईल.
जगभरातून येणाऱ्या भाविकांना गुगल मॅप्सच्या माध्यमातून रस्त्यांची, पर्यायी मार्गांची आणि प्रवेशद्वारांची अद्ययावत माहिती वेळेत मिळणार आहे. यामुळे भाविकांचा मौल्यवान वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
नवीन सॉफ्टवेअर आणि ‘डिजिटल कुंभ’
महापालिकेच्या वतीने एक विशेष सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. हे सॉफ्टवेअर मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही नेटवर्क, ड्रोन कॅमेरे आणि वाहतूक विभागाची माहिती एकत्रित करून एक आधुनिक प्रणाली कार्यान्वित करेल. कॅमेरे सुरू झाल्यावर सुमारे सहा महिने सिम्युलेशन पद्धतीने या संपूर्ण व्यवस्थेचा अभ्यास केला जाईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबविण्याचे आणि पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी इमेज रेकग्निशन आणि डेटा बेसचा वापरही कॅमेरा नेटवर्कशी जोडून करण्याची योजना आहे.
SL/ML/SL 6 Oct. 2025