स्पर्धेसाठी भारतात आलेल्या विदेशी प्रशिक्षकांना श्वानांचा चावा

नवी दिल्ली, दि. ४ : सध्या दिल्लीत जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सुरू आहे. यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप प्रशिक्षणासाठी आलेल्या जपानचे प्रशिक्षक मीको ओकुमात्सू (Meiko Okumatsu) आणि केनियाचे प्रशिक्षक डेनिस मरागिया (Dennis Maragia) यांना एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या घटनेनंतर स्टेडियममध्ये तातडीने कुत्रे पकडणाऱ्यांना बोलावण्यात आले. राजधानी दिल्लीतील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर सध्या वाद सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे चिंता वाढली आहे. जागतिक स्पर्धेदरम्यान अशी घटना घडल्याने सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
परदेशी प्रशिक्षकांचा कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर दोघांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये (Safdarjung Hospital) नेण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांच्या हॉटेलवर सोडण्यात आले. या घटनेनंतर पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या आयोजक समितीने एक अधिकृत निवेदन जारी केले. निवेदनानुसारत्यांनी दिल्ली महानगरपालिकेला (MCD) स्टेडियममधून भटक्या श्वानांना हटवण्याची आणि परिसर सुरक्षित ठेवण्याची विनंती केली होती. MCD ने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छ केला होता, तसेच सतत दक्षता घेण्यासाठी डॉग कॅचिंग वाहने तैनात केली होती, असेही समितीने स्पष्ट केले.
आयोजकांनी निवेदनात म्हटले आहे की, इतकी खबरदारी घेऊनही काही व्यक्तींकडून वारंवार स्टेडियमजवळ भटक्या कुत्र्यांना खाद्य (Feeding Stray Dogs) दिले जात असल्यामुळे ही जनावरे पुन्हा परिसरात प्रवेश करत आहेत. दुर्दैवाने, याच कारणामुळे 3 ऑक्टोबर 2025 रोजी वॉर्म-अप ट्रॅकवर दोन घटना घडल्या आणि जपान व केनियाच्या प्रशिक्षकांना श्वानांनी चावा घेतला.
SL/ML/SL 4 Oct. 2025