म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील शेकडो रहिवासी उतरले रस्त्यावर

 म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील शेकडो रहिवासी उतरले रस्त्यावर

पुणे प्रतिनिधी –म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील म्हाडाच्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून म्हाडाच्या अनागोंदी कारभारामुळे “कोणी नवीन घर देत का घर” अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. पुणे लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या वतीने व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्यावतीने (ता. ३) रोजी पुणे स्टेशन येथील म्हाडाच्या इमारतीला शेकडो नागरिकांनी घेरावा घातला होता. यावेळी नागरिकांनी म्हाडाच्या आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. “घर आमच्या हक्काच” मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य शासनाचा मुर्दाबाद, म्हाडाचा धिक्कार असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमान्यनगर बचाव कृती समिती तर अजय बल्लाळ यांनी महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा कृती समिती येथील रहिवाशांची बाजू मांडली.

नागरिकांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “आम्हाला आमची स्वप्नं साकार करू द्या, आमच्या घरांवर विकासकांवर आणलेले स्थगिती अगोदर उठवा, मगच चर्चा अशी नागरिकांनी ठाम भूमिका घेतली. परिणामी गोंधळातच वादळी चर्चा झाली. आम्हाल आमची स्वप्न पाहू द्या आणि पूर्ण करू द्या, तुम्ही आम्हाला गृहित धरू नका, म्हाडाने आणलेले स्थगिती त्वरित हटवा, एकल विकासला आमचा विरोध आहे, आमचा आम्हाला विकास करू द्या, रहिवाशांना विचारात घेऊनच स्वतः रहिवाशांना घरांचे पुनर्विकासाला करू द्या. यावेळी नागरिकांनी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे अध्यक्ष आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहुल समोरे यांना भेटून नागरिकांनी निवेदन दिले.

गेली अनेक वर्षं चर्चेत असलेला लोकमान्यनगर पुनर्विकास सुरळीतपणे होऊ लागलेला असतानाच पुनर्विकास प्रक्रियेला खीळ बसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या. नागरिक म्हणाले की लोकमान्यनगर येथील काही इमारती तिरक्या झाल्या आहेत. अशा नरक यातना सोसत येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून राहत आहेत. येथील सर्व इमारती कॉपरेटिव सोसायटी रजिस्टर झाल्या आहेत. त्यांचे प्रॉपर्टी कार्ड व नोंदणी झाली आहे. सेल डीड, लीस डीड, कन्व्हेन्स डिड झाले असून देखील म्हाडाच्या भोंगळ कारभारामुळे येथील नागरिक हवालदिल झाले आहेत.

महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील नागरिकांनी बोलताना सांगितले की गेली अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करत आहोत. म्हाडाने आणि राज्य शासनाने यावर तात्काळ लक्ष द्यावे. शासनाकडून त्वरित दखल जो पर्यंत घेतली जात नाही. तो पर्यंत हा लढा चालूच राहणार असून हा लढा भविष्यात तीव्र होणार असल्याचे पुणे लोकमान्यनगर कृती समिती व महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड पुनर्विकास कृती समिती येरवडा यांच्या वतीने सांगण्यात आले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *