राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष मेळाव्यात स्वदेशीचा नारा

नागपूर, दि. २ : येथील रेशीमबाग मैदानावर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षाचा विजयादशमी मेळावा अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
संघाच्या शताब्दी वर्षात स्वदेशीचा नारा केवळ घोषवाक्य न राहता, तो एक सामाजिक चळवळ बनवण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे. हे अभियान देशभरात जनजागृती, कुटुंब प्रबोधन, आणि सामाजिक समरसतेच्या माध्यमातून राबवले जाणार आहे. विजयादशमी मेळाव्यात “स्वदेशीचा नारा” विशेष ठळकपणे गाजला. संघाने आपल्या शताब्दी वर्षात पंच परिवर्तन अभियानांतर्गत ‘स्व’ आधारित जीवनशैलीवर भर देत स्वदेशी विचारसरणीला नवसंजीवनी दिली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “स्वदेशी ही केवळ आर्थिक संकल्पना नाही, तर ती आत्मनिर्भरतेची आणि सांस्कृतिक अस्मितेची अभिव्यक्ती आहे.” त्यांनी स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, स्वपरंपरा आणि स्वभ्रमण यांचा उल्लेख करत भारतीय जीवनपद्धतीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाने ‘एक शताब्दी, एक उद्देश्य – राष्ट्रहित सर्वोपरि’ हा संदेश दिला असून, स्वदेशीचा नारा त्याच विचारधारेचा भाग आहे. संघाच्या पंच परिवर्तन अभियानात स्वदेशी जीवनशैलीला विशेष स्थान देण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उत्पादनांचा वापर, पारंपरिक ज्ञानाचे जतन, आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली जीवनशैली यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता सरसंघचालकांच्या शस्त्रपूजनाने झाली. ही परंपरा धर्माचे रक्षण आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतीक मानली जाते. यानंतर योग प्रात्यक्षिके, नियुद्ध, घोष वादन, प्रदक्षिणा आणि पथसंचलन अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी संचलनात भाग घेतला, ज्यातून संघाची शिस्त आणि एकात्मता स्पष्टपणे दिसून आली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या आयुष्यावर दोन डॉक्टरांचा प्रभाव आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. मोहन भागवत. त्यांनी संघाच्या राष्ट्रसेवेतील योगदानाची प्रशंसा केली आणि संघाच्या शताब्दी वर्षात देशासाठी नव्या प्रेरणांचा उदय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
संघाने शताब्दी वर्षानिमित्त देशभरात एक लाखाहून अधिक हिंदू संमेलनांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पंच परिवर्तन – पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, स्वबोध, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य – या विषयांवर विशेष जनजागृती केली जाणार आहे.
या ऐतिहासिक विजयादशमी मेळाव्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात केली असून, देशभरातील लाखो स्वयंसेवक आणि नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. संघाच्या कार्याचा विस्तार आणि प्रभाव यामुळे समाजात सकारात्मक परिवर्तनाची दिशा निश्चित होत आहे.
SL/ML/SL