RSS च्या शताब्दी निमित्त विशेष नाणे प्रसिद्ध

नवी दिल्ली, दि.१:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत विशेष नाणे आणि टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे. दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित शताब्दी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे नाणे आणि तिकीट जारी करण्यात आले. या कार्यक्रमात संघाच्या देशसेवेतील योगदानाची दखल घेतली गेली आणि संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा गौरव करण्यात आला.
विशेष नाणे ₹१०० मूल्याचे असून ते शुद्ध चांदीचे बनवलेले आहे. या नाण्यावर भारतमातेची वरद मुद्रेत भव्य प्रतिमा आहे आणि तिच्या बाजूला आरएसएसचे ब्रीदवाक्य “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम” कोरलेले आहे. हे नाणे भारताच्या नाणे इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेची प्रतिमा दर्शवते, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचे राष्ट्रीय चिन्ह आहे, जे भारताच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक मानले जाते.
या विशेष टपाल तिकिटावर १९६३ साली प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर (आताचे कार्तव्यपथ) झालेल्या आरएसएस कार्यकर्त्यांच्या ऐतिहासिक संचलनाचा फोटो आहे. हे संचलन भारत-चीन युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निमंत्रणावरून झाले होते. या तिकिटाद्वारे संघाच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण देशवासियांना करून देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात संघाच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करताना सांगितले की, संघाच्या किना-यावर अनेक आयुष्ये प्रफुल्लित झाली आहेत आणि संघाने देशाच्या प्रत्येक क्षेत्राला आपला स्पर्श दिला आहे. हे विशेष नाणे आणि टपाल तिकीट केवळ स्मृतीचिन्ह नसून, संघाच्या शतकपूर्तीचा गौरव करणारे राष्ट्रीय सन्मान आहेत.
SL/ML/SL
1 Oct 2025