जगातील पहिली विनाचालक इलेक्ट्रिक रिक्षा भारतात लाँच
मुंबई,दि. ३० : मुंबईत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ओमेगा सेकी मोबिलिटी (OSM) या भारतीय कंपनीने ‘स्वयंगती’ नावाची जगातील पहिली चालकविरहित इलेक्ट्रिक तीन चाकी वाहन सादर केली आहे. ही ऑटो रिक्षा पूर्णपणे स्वयंचलित असून कोणत्याही चालकाशिवाय ठरवलेल्या मार्गावर प्रवास करू शकते. तिची प्रारंभिक शोरूम किंमत ₹4 लाख असून लॉजिस्टिक्स आणि कार्गो वापरासाठी खास आवृत्ती ₹4.15 लाखांपासून उपलब्ध होणार आहे.
‘स्वयंगती’ ही तीन चाकी वाहन OSM च्या इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे. एका चार्जवर हे वाहन सुमारे 120 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. हे वाहन विशेषतः विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे, स्मार्ट कॅम्पस, गेटेड कम्युनिटी आणि शहरी भागात वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्वनियोजित मार्गाचे नकाशे तयार करून प्रवाशांना सुरक्षित आणि अचूकपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. अलीकडेच ‘स्वयंगती’ने ३ किलोमीटरचा स्वयंचलित मार्ग यशस्वीरित्या पूर्ण केला असून त्यात सात नियोजित थांबे, अडथळा ओळखण्याची क्षमता आणि प्रवासी सुरक्षेची वैशिष्ट्ये समाविष्ट होती – हे सर्व चालकाशिवाय.
OSM चे संस्थापक उदय नारंग यांनी सांगितले की, हे वाहन केवळ उत्पादन नसून भारताच्या वाहतूक क्षेत्राला नवीन दिशा देणारा उपक्रम आहे. त्यांच्या मते, स्वायत्त वाहने ही आता केवळ कल्पना न राहता वास्तवात उतरलेली गरज आहे. OSM चे मुख्य धोरण अधिकारी विवेक धवन यांनी स्पष्ट केले की, ‘स्वयंगती’ हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी सुलभ आणि परवडणारे बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मॅककिन्सेच्या अंदाजानुसार, 2023 पर्यंत जागतिक स्वायत्त वाहन बाजारपेठेचा आकार 620 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होईल. अशा वेळी ‘स्वयंगती’ हे भारतात विकसित झालेले पहिले स्वायत्त वाहन असून ते या जागतिक ट्रेंडशी जुळवून घेण्यास तयार आहे. कंपनी लवकरच व्यावसायिक वापरासाठी याचे दुसरे टप्पे सुरू करणार आहे.
SL/ML/SL
30 Sept. 2025