सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण

 सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई दि ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे उत्साहात अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम’ गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संयुक्त संकल्पनेतून राज्यात सार्ध शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

राज्यभरात सार्ध शताब्दी महोत्सव समितीच्या माध्यमाने देशभक्तीवर विविध कार्यक्रम होणार असून यात प्रामुख्याने ‘वंदे मातरम’ गीताचे प्रत्येक तालुक्यात समूहगान होणार आहे. ‘वंदे मातरम’ बोधचिन्हाच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कामगार मंत्री आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागासवर्गीय विभागाचे मंत्री अतुल सावे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह कौशल्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या. या महोत्सवाच्या अधिकृत लोगो करीता कौशल्य विभागाच्या अंतर्गत बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात मंत्री लोढा म्हणाले की, वंदे मातरम गीताला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य या गीतात आहे. भारतमातेच्या या राष्ट्रगीताचा गौरव जनतेच्या उत्सुर्फ सहभागाने झाला पाहिजे. त्यामुळेच या महोत्सवासाठी जनतेच्या सहभागातून बोधचिन्हाचे निवड करण्यात आली आहे.

५ ते १० सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन झालेल्या या बोधचिन्ह डिझाईन स्पर्धेत राज्यातल्या ३५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयातील तज्ञ परीक्षकांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाचे प्राध्यापक रवी पवार यांनी डिझाईन केलेल्या आकर्षक आणि कलात्मक बोधचिन्हाची निवड केली आहे.

विविध सामाजिक संघटना, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच सामाजिक माध्यमांवर या ऐतिहासिक सोहळ्याला व्यापक रूप देण्याचा कौशल्य आणि सांस्कृतिक विभागाचा प्रयत्न आहे. देशभक्ती जागृत करणाऱ्या सार्ध शताब्दी महोत्सवात सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन मंत्री लोढा आणि शेलार यांनी जनतेला केले आहे. राज्यातील कौशल्य विद्यापीठ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल.

तसेच सांस्कृतिक विभागाकडूनही राज्यातील ग्रामीण भागातही सार्ध शताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. त्यासंदर्भात शासकीय आणि अशासकीय सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आलीय. प्रतिष्ठित व्यक्तींचा त्यात समावेश करण्यात आला आहे, अशी माहितीही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *