पंतप्रधानांच्या हस्ते BSNL च्या स्वदेशी निर्मित ‘4जी’ सेवेचे लोकार्पण

पुणे, दि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘4G’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या 92 हजार 633 टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी 9 हजार 30 टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते ‘4G’ नेटवर्कच्या दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पणानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर येरवडा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, भारती एअरटेलचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, खासदार मेधा कुलकर्णी, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार, दूरसंचार विभागाचे विशेष महासंचालक आर. के. गोयल उपस्थित होते.
सुरूवातीला स्वतःचे 4जी तंत्रज्ञान फिनलँड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या चार देशांकडे होते. चीन हे तंत्रज्ञान देण्यासाठी सहकार्य करणार नव्हते. त्यामुळे आत्मनिर्भर भारत करण्यासाठी तंत्रज्ञान निर्मितीसाठी देशातील कंपन्यांना एकत्रित करून प्रयत्न सुरू झाले. सी-डॉट, तेजस, आयआयटी, तेजस, टीएसएस आणि बीएसएनएल यांनी देशी तंत्रज्ञानावर आधारित 4जी तंत्रज्ञानाची निर्मिती करून भारत या क्षेत्रातील पाचवा देश बनला आहे. भारताला ज्या-ज्यावेळी कोणी आव्हान दिले त्यावेळी भारताने आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारतातील ज्ञान, तेज, कर्मण्यतेद्वारे आपण जगाला उत्तर देऊ शकतो आणि आजचा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.