हंसचा दिवाळी अंक लक्षाधीश झाला!

 हंसचा दिवाळी अंक लक्षाधीश झाला!

पनवेल, दि २६: मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, देशातील सर्वाधिक बक्षिस रकमेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत यंदा पहिल्या क्रमांकाचा लक्षाधीश होण्याचा मान अभिराम आनंद अंतरकर संपादित ‘हंस’ दिवाळी अंकाने पटकावला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे गुरुवारी शानदार सोहळ्यात वितरण करण्यात आले.

राज्यस्तरीय स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे (₹५०,०००) पारितोषिक प्रज्ञा जांभेकर संपादित अंतरीचे प्रतिबिंब याला तर तृतीय क्रमांकाचे (₹२५,०००) पारितोषिक मीना कर्णिक संपादित अक्षर दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आले. रायगड जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक इंद्रधनु अंकाने पटकाविले; त्यांना ₹४०,००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल शहरातील ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात’ संपन्न झाला. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे व देवदास मटाले, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत व सचिव परेश ठाकूर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, लेखक, साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी अंकामुळे दिवाळी सण ज्ञानाचा उत्सव – मोरे

“मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवाळी ही केवळ फराळ, फटाके व आनंदसोहळ्यापुरती मर्यादित नसून, दिवाळी अंकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार, साहित्य व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी सण हा दिवाळी अंकांच्या अनुषंगाने ज्ञानाचाही उत्सव आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी या वेळी केले.

दिवाळी अंकांची गोडी कधीच कमी होणार नाही – रामशेठ ठाकूर

“डिजिटलच्या युगातही वर्तमानपत्राचे महत्त्व आजही कायम आहे. ९० टक्के पत्रकार हे दिवाळी अंकांच्या निर्मितीत सहभागी असतात. लेखन व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ही स्पर्धा आहे. दिवाळी अंकांची गोडी कधीच कमी होणार नाही,” असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

दिवाळी अंकांना शासनाचे अनुदान मिळावे – संदीप चव्हाण

“शंभर वर्षांहून अधिक काळ दिवाळी अंकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वीण घट्ट केली आहे. पण आता हे दिवाळी अंक काढणे आर्थिकदृष्ट्या अवघड होत चालले आहे. प्रायोगिक नाटकांना पन्नास प्रयोगांनंतर अनुदान मिळते; व्यावसायिक नाटकांनाही अनुदान आहे. अगदी गणेशोत्सवात भजनी मंडळांनाही दहा हजाराचे अनुदान मिळाले. मग शतकभराची परंपरा जपणाऱ्या दिवाळी अंकांना सरकारने आधार द्यायला हवा,” अशी मागणी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मांडली.

त्यांनी पुढे सुचवले की, “१० वर्षे वा त्याहून अधिक काळ सातत्याने प्रकाशित होणाऱ्या अंकांना सरकारने त्यांच्या वर्षानुसार अनुदान द्यावे. त्यामुळे साहित्य अधिक सकस होईल. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घ्यावा. आपण कला व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना शिष्टमंडळ घेऊन भेटूया, या शिष्टमंडळात मुंबई मराठी पत्रकार संघासोबत ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, दिवा या दिवाळी अंक प्रकाशक आणि संपादक संघटनेचे विवके मेहत्रे आपल्यासोबत येतील,” असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्काळ होकार दिला.

अन्य मान्यवरांची भाषणे

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते ठाकूर यांचे कार्य अधोरेखित केले. “दरवर्षी साडेचार लाखांहून अधिक रकमेची बक्षिसे देऊन ते दिवाळी अंकांना प्रोत्साहन देतात,” असे ते म्हणाले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा देत सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय निकाल (महत्वाचे पारितोषिक):

सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक: हंस (₹१,००,००० + सन्मानचिन्ह)
द्वितीय: अंतरीचे प्रतिबिंब
तृतीय: अक्षर
लक्षवेधी उत्कृष्ट अंक: कालनिर्णय
सर्वोत्कृष्ट विशेषांक: नवभारत
मुलांसाठी अंक: वयम
उत्कृष्ट कथा: ‘सत्याग्रह’, मिलिंद बोकील (दीपावली)
उत्कृष्ट कविता: आजकाल बायकाही…, लेखिका लक्ष्मी यादव (पुरुष स्पंदन)
सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार: प्रभाकर वाईरकर (शब्दरुची)
सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक: विवेक मेहेत्रे (उद्वेली – ऑल दि बेस्ट २०२४)
रायगड जिल्हास्तरीय निकाल:

प्रथम: इंद्रधनु
द्वितीय: आगरी दर्पण
तृतीय: शब्दसंवाद
उत्तेजनार्थ: साहित्य आभा
फोटो ओळ:

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित दिवाळी स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक हंस दिवाळी अंकाचे संपादक अभिराम आनंद अंतरकर यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करताना. सोबत संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि इतर मान्यवर.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *