ज्येष्ठ साहित्यिक एस.एल. भैरप्पा यांचे निधन

बंगळुरु, दि. २४ : ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि तत्त्वज्ञ एस. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मश्री’ सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवलेल्या भैरप्पा यांनी ‘पर्व’ आणि ‘आवरण’ यांसारख्या वादग्रस्त आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बंगळूरु येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी बुधवारी (24 सप्टेंबर) दुपारी वाजता अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
भैरप्पा त्यांच्या कादंबऱ्या मराठीसह अन्य भारतीय भाषांत अनुवादल्या गेल्या आहेत. त्यांच्या ‘वंशवृक्ष’, ‘पर्व’, ‘जा ओलांडुनी’, ‘धर्मश्री’, ‘तंडा’, ‘काठ’, ‘सार्थ’ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना आकर्षित केले आहे. त्यांचे ‘सत्य आणि सौंदर्य’, ‘मी का लिहितो?’ यांसारखे वैचारिक ग्रंथ इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झाले आहेत. भैरप्पा यांना अभिजात भारतीय संगीत आवडते. त्यावरही त्यांनी कादंबरी रचली होती.
भैरप्पा यांनी १३ वर्ष वयाचे असताना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. प्राथमिक शालेय शिक्षण गावीच पूर्ण केल्यावर ते म्हैसूरला पुढच्या शिक्षणासाठी जाण्यापूर्वी भावाच्या सांगण्यावरून शिक्षण सोडून देशभर भ्रमंती केली. मुंबईला रेल्वे पोर्टर म्हणून अल्प काळ काम केल्यावर ते काही साधूंबरोबर आध्यात्मिक शांतीच्या शोधार्थ बाहेर पडले. थोडे महिने त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर ते म्हैसूरला आले व त्यांनी आपले शिक्षण पुन्हा सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञान विषयात डाॅक्टरेट मिळवली. हुबळी महाविद्यालय, गुजराथचे सरदार पटेल विद्यापीठ, दिल्लीतील एन.सी.ई.आर.टी.(नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) अशा संस्थांमध्ये भैरप्पांनी प्राध्यापकी केली, आणि शेवटी म्हैसूरमधील रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून १९९१ मध्ये निवृत्ती घेतली.
भैरप्पांनी सन १९५८ पासून कादंबरी लेखनास आरंभ केला. १९६२ साली त्यांची वंशवृक्ष ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून पुढे ५०हून अधिक वर्षे ते लिहीतच राहिले. सर्वाधिक विक्री झालेल्या २२ गंभीर कादंबऱ्यांचे ते लोकप्रिय लेखक आहेत. ‘आवरण’ कादंबरीच्या चार वर्षात ३४ आवृत्त्या निघाल्या, हा भारतीय कादंबरी विश्वातला विक्रम समजला जातो. १९८७ साली ‘वंशवृक्ष’चा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यानंतर भैरप्पांना मराठीतही लोकप्रिय कादंबरीकार म्हणून स्थान मिळाले. मराठीबरोबर डॉ. एस.एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद हिंदी, संस्कृत, इंग्रजी आणि इतर बहुतांश भारतीय भाषांमध्ये झाले आहेत.
भैरप्पा यांची साहित्यकृती- अंचू (कादंबरी, मराठीत ‘काठ’- मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी). अवेषण (कादंबरी, मराठीत ‘परिशोध’- मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी). आवरण (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी). या कादंबरीच्या २० वर्षांत २२ आवृत्त्या निघाल्या. उत्तराकांड, कथे मत्तु कथावस्तू कवालू, गृहभंग, ग्रहण, छोर, तंतु (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), तब्बलियु नीनादे मगने (मराठीत ‘पारखा’, -कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), दाटु (कादंबरी, मराठीत ‘जा ओलांडुनी’; मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), दूर सरिदारु, धर्मश्री, नानीके बरेयुत्तीने, नायी नेरालु, निराकरण, नेले. पर्व (महाभारतावरील कादंबरी, मराठी अनुवाद – उमा कुलकर्णी), भित्ती, भीमकाया, मतदान, मंद्र (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), याना वंशवृक्ष (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), वामशवृक्ष, साक्षी (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी), सार्थ (कादंबरी, मराठी अनुवाद – सौ. उमा कुलकर्णी)
एस.एल. भैरप्पा यांना मिळालेले पुरस्कार एन.टी.आर नॅशनल लिटररी ॲवॉर्ड (२००७), कन्नड साहित अकादमी पुरस्कार (१९६६), श्री कृष्णदेवराय ॲवाॅर्ड (२०१७), नडोजा ॲवाॅर्ड (२०११), नृपतुंगा ॲवाॅर्ड (२०१७), गुलबर्गा विद्यापीठाकडून मानद डाॅक्टरेट (२००७), पद्मश्री पुरस्कार (२०१६), पंपा पुरस्कार (२००५), बेटागिरी कृष्ण शर्मा ॲवाॅर्ड (२०१४), वाग्विलासिनी पुरस्कार (२०१२), सरस्वती सन्मान (इ.स. २०११)- ‘मंद्र’ या कादंबरीसाठी के.के. बिर्ला फाऊंडेशनकडून. साहित्य अकादमी पुरस्कार (१९७५) – ‘दाटु’ ह्या कन्नड कादंबरीसाठी पद्मविभूषण
एस.एल. भैरप्पा यांचे झालेले सन्मान सन १९९९ मध्ये झालेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. *भारत सरकारतर्फे राष्ट्रीय संशोधन प्रोफेसर म्हणून मान्याता (२०१४). के.के. बिर्ला फाऊंडेशनतर्फे ‘मंद्र’ या पुस्तकासाठी विसाव्वा ‘सरस्वती सन्मान’ (२०११).भारत सरकारकडून साहित्य अकादमीची शिष्यवृत्ती (२०१५).