अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

लातूर दि २४ : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात पूरपरिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पांढरी-वरली संगमस्थानाची आणि तीन नद्यांच्या संगमस्थळाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत पावसाचे वाढलेले प्रमाण पाहता शासनाला पारंपरिक पद्धतीऐवजी वेगळ्या दृष्टीकोनातून काम करावे लागेल. ज्या ठिकाणी दोन-तीन नद्यांचा संगम आहे, अशा ठिकाणी नव्याने बंधारे उभारणे आवश्यक आहे. पूरग्रस्त भागातील गावांचे संरक्षण करण्यासाठी नदीकाठच्या बाजूंना तटबंदी उभारण्याचेही नियोजन सरकारकडून करण्यात येईल,” असे ते म्हणाले.
यावेळी निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पूरप्रश्नावर विविध मागण्या मांडल्या. त्याबाबत शासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्याचा शासनाचा ठाम निर्धार आहे. पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर तसेच मोबाईलवरून घेतलेले फोटोही ग्राह्य धरले जातील. एनडीआरएफच्या निकषांनुसार शासन शेतकऱ्यांच्या बाजूने जास्तीत जास्त शिथिलता ठेवून निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांना मदत लवकरात लवकर मिळावी, हीच शासनाची भूमिका आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, निलंगाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व विविध राजकीय नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी पूरजन्य परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि स्थानिक लोकांशी संवाद साधून शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.ML/ML/MS