अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थसहाय्यातून तयार झाले दीड लाख मराठा उद्योजक

मुंबई, दि २३
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले, अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि समाजोपयोगी योजना आखून त्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना मानाने प्रस्थापित करण्याचे मोलाचे काम केले आहे. या कार्याची दखल घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 92 व्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. फडणवीस यांनी पुनर्स्थापना केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अर्थसहाय्यामुळे दीड लाख मराठा उद्योजक बनले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी श्री. पाटील म्हणाले की, काँग्रेस राजवटीत मराठा समाजाला विस्थापित करण्याचे काम करण्यात आले तर श्री . फडणवीस यांनी मराठा समाजातील युवा पिढीला व्यवसाय उद्योगांसाठी सर्वाधिक निधी, तसेच योजना आखून त्यांना उद्योजक बनण्याची संधी दिली. श्री. फडणवीस यांनी 2016 पासून मराठा समाजाच्या हिताचे काम करत स्व. अण्णासाहेबांचे मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पूर्णत्वास नेले या शब्दांत श्री. पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली. राज्यात सर्वाधिक काळ काँग्रेसची राजवट होती मात्र तत्कालिन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केवळ पोकळ आश्वासने दिली . महामंडळाला मिळालेल्या निधीची आकडेवारी समोर ठेवत श्री. पाटील यांनी महायुती सरकार आणि मविआ, काँग्रेस सरकार यांच्या काळात महामंडळाला मिळालेल्या निधीची तुलना केली. अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 1999 ते 2014 या काळात काँग्रेस – राष्ट्रवादी सत्तेत असताना केवळ 50 कोटींची तरतूद होती. श्री. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही तरतूद 2018-2019 दरम्यान 100 कोटींपर्यंत गेली. मात्र उद्धव ठाकरेंचे मविआ सरकार सत्तेत असताना 50 कोटी जाहीर केले मात्र प्रत्यक्षात तोंडाला पाने पुसली गेली. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 100 कोटींनी तरतूद वाढवण्यात आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 300 कोटी, नंतर 24 -25 ला 400 कोटी आणि पुढच्या अर्थसंकल्पात तब्बल 750 कोटी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
महामंडळामार्फत कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करून हजारो तरुणांना आणि गटांना उद्योजकतेची नवी संधी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास 13 हजार 250 कोटींचे कर्ज मराठा युवा उद्योजकांना दिले आहे. महायुती सरकारच्या आवाहनाला अनुसरून बँकांनी महामंडळावर आणि मराठा युवा उद्योजकांवर विश्वास ठेवत कर्ज दिले. जवळपास 1300 कोटींचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने दिला आहे. KK/ML/MS