उपग्रहांच्या संरक्षणासाठी भारत विकसित करणार बॉडीगार्ड उपग्रह

अंतराळातील वाढत्या धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे — ‘बॉडीगार्ड उपग्रह’ विकसित करण्याची. हे उपग्रह भारतीय अंतराळ यंत्रणांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करतील आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित नजर ठेवतील. २०२४ मध्ये एका शेजारील देशाचा उपग्रह इस्रोच्या उपग्रहाच्या केवळ १ किलोमीटर अंतरावरून गेला होता, त्यानंतर या योजनेला गती मिळाली.
या उपग्रहांची उंची सुमारे ५००–६०० किलोमीटर असेल आणि ते लष्करी मॅपिंग व देखरेखीसाठी सज्ज असतील. सरकारने २०२९ पर्यंत ५२ विशेष संरक्षण उपग्रह अवकाशात पाठवण्याचा निर्णय घेतला असून, हे उपग्रह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित असतील. ते एकमेकांशी संवाद साधून पृथ्वीवर सिग्नल, संदेश आणि प्रतिमा पाठवू शकतील.
या योजनेअंतर्गत LiDAR उपग्रह आणि जमिनीवर आधारित रडार प्रणाली विकसित केली जात आहे, ज्यामुळे धोके वेळेत ओळखता येतील आणि उपग्रहांना सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. संरक्षण अंतराळ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली SBS-3 (Space-Based Surveillance Phase-3) योजना राबवली जात असून, यासाठी ₹२६,९६८ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले आहे.
जून २०२५ मध्ये एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी चीनच्या अंतराळ क्षमतेबाबत इशारा दिला होता. चीनने अवकाशात लष्करी उपग्रहांची संख्या झपाट्याने वाढवली असून, भारताच्या सुरक्षेसाठी हे गंभीर आव्हान ठरू शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने उपग्रहांच्या मदतीने जैश-ए-मोहम्मदविरुद्ध कारवाई केली होती, मात्र रिअल-टाइम ट्रॅकिंगमध्ये त्रुटी आढळल्यामुळे या नव्या योजनेची गरज अधोरेखित झाली आहे.