24 तास सुरु राहणार सप्तशृंगी देवीचं मंदिर

साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असलेलं सप्तशृंगी देवीचं मंदिर 24 तास सुरू राहणार आहे. यंदाच्या नवरात्रीत सुमारे 15 लाख भाविक देवीच्या चरणी लीन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने सर्व नियोजन केलं आहे. आज सकाळी 7 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा झाली. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सप्तशृंगी मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
23 सप्टेंबरपासून ते 30 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते पंचामृत महापूजा होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी अष्टमीच्या दिवशी सकाळी 7 वाजता पालखी पूजन आणि नगरप्रदक्षिणा होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी शतचंडी याग होमहवन पूजा करण्यात येणार असून त्याच दिवशी दुपारी 3 वाजता दरेगावचे पारंपारिक मानकरी गवळी पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सप्तशृंग गावात कीर्ती ध्वजाची मिरवणूक निघणार आहे. नवमीच्या दिवशी रात्री 12 वाजता सप्तशृंगी गडाच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येईल.
दसऱ्याच्या दिवशी (2 ऑक्टोबर) रोजी शतचंडी याग पूर्णाहुती आणि महापूजा करण्यात येईल. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी असलेल्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पंचामृत महापूजाकरून विविध कावडी धारकांनी कावडीने आणलेल्या ठिकठिकाणच्या तीर्थांचा देवीला महाभिषेक घातला जाईल. त्याच दिवशी रात्री 9 ते 12 वाजन्याच्या देवीची आरती होईल. 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी गडावर शांतीपाठ आणि महाप्रसादाचं आयोजन देवस्थानच्यावतीने करण्यात आलं आहे. यावर्षी नवरात्रौत्सवासाठी सुमारे 15 लाख भाविक येणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
सप्तशृंगी गडावर सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत सप्तशृंगीगड ते नांदुरी घाट रस्ता खासगी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर 24 तास फक्त बससेवा सुरू राहणार आहे. भाविकांनी आपली खासगी वाहने नांदुरी येथेच पार्क करावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.