पाकच्या लष्कराकडून स्वतःच्याच नागरिकांवर बॉम्ब हल्ला, ३० जणांचा मृत्यू

इस्लामाबाद, दि. २२ : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावावर आज (दि.२२) पहाटे दोन वाजता पाकिस्तानच्या हवाई दलाने अचानक हवाई हल्ला केला. JF-17 लढाऊ विमानांमधून एकामागून एक आठ LS-6 प्रकारचे बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात हाहाकार माजला असून, किमान ३० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचा आणि लहान मुलांचा समावेश असून, २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यामुळे गावातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून, रस्तेही पूर्णपणे नष्ट झाले आहेत. नागरिक झोपेत असताना बॉम्बस्फोट झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू झोपेतच झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून बचावकार्य करत आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तान सरकारने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. हल्ल्याचे कारण दहशतवादविरोधी कारवाई असल्याचे सांगितले जात असले तरी, निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यामुळे मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. सोशल मीडियावर या हल्ल्याचे भयावह दृश्ये व्हायरल होत असून, पाकिस्तानच्या लष्कराच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होण्याची शक्यता आहे.