भारताकडून या सिनेमाची ऑस्कर २०२६मध्ये एन्ट्री

मुंबई,दि. १९ : नीरज घायवान दिग्दर्शित ‘होमबाउंड’ या चित्रपटाची २०२६ च्या ऑस्करसाठी भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘होमबाउंड’ मध्ये ईशान खट्टर , विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत. फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचं कौतुक करण्यात आलेलं. २०२५ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘अन सर्टेन रिगार्ड’ विभागात या चित्रपटाचा प्रीमियर रिलीज झाला होता. त्यादरम्यान या सिनेमाला नऊ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं.
‘होमबाउंड’ ला २०२५ च्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये इंटरनॅशनल पीपल्स चॉइस अवॉर्डसाठी दुसरा रनर-अप घोषित करण्यात आलं होतं आणि या सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशन देखील मिळालं होतं. धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट द न्यू यॉर्क टाइम्सच्या ‘टेकिंग अमृत होम’ या लेखावर आधारित आहे. भारतातील जातीय आणि धार्मिक भेदभाव, त्याचबरोबर दोन मित्र त्यांचं आयुष्य पुन्हा सुधारण्यासाठी कसा संघर्ष करतात हे या सिनेमात दाखवलं आहे. क्लायमॅक्समध्ये लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगारांबद्दलही या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.