आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत बांबू परिषद

मुंबई, दि. १६ :- वातावरण बदलाचे संकट रोखून मानव जात वाचवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. दि. 18 आणि 19 सप्टेंबर 2025 मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही बांबू परिषद होणार आहे.
“बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ” अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी परिषदेबाबत माहिती दिली.
पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे. वातावरण बदलामुळे जंगलातील आगी, ढगफुटी, महापूर आणि उष्ण लहरी यासारख्या आपत्ती वाढल्या आहेत. बांबू हा ‘कल्पवृक्ष’ असून, तो कार्बन शोषण, जंगलतोड रोखणे आणि जैवइंधन निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) व फिनिक्स फाउंडेशन, लोदगा, जि.लातूर यांच्या संयुक्तविद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बांबू परिषद महाराष्ट्राला बांबू राजधानी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले.
पाशा पटेल म्हणाले, जगभरातील देशभरातील आणि राज्यभरातील तज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांना मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आयोजित या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मानव जातीच्या अस्तित्वाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा यामध्ये होणार आहे. यामध्ये बांबूपासून इथेनॉल, मिथेनॉल, थर्मल साठी बांबू पॅलेट्स, लोखंड चारकोल, लाकूड, फर्निचर, बांबू कपडे असे अनेक उद्योग ,कौशल्य, पर्यावरण, प्लास्टिक मुक्तीतून शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल अपेक्षित असणार आहे. शहरी वनीकरण (Urban Forest), ऑक्सिजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.ML/ML/MS