मुंबईतील पहिल्या ‘अधिकृत’ कबुतरखान्या’चे उद्घाटन

मुंबई, दि. १५ :
दादरमधील कबुतरखान्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. जैन समाजाकडून हा कबुतरखाना हटवण्याला विरोध करण्यात आला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल (14 सप्टेंबर) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती जैन मंदिरात एका नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन केले आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाचे विकार आणि घाणीच्या तक्रारींमुळे शहरात अनेक कबुतरखाने बंद करण्यात येत असताना, हा कायदेशीर मार्ग काढल्याबद्दल लोढांनी समाधान व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी दादरमधील कबुतरखान्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. परिसरातील रहिवाशांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार केली होती. अनेक नागरिकांनी हे कबुतरखाना हटवण्याची मागणी केली होती. तर जैन समाजाने याला विरोध करत देखभालीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले होते. हा वाद शेवटी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला होता, ज्यानंतर कबुतरखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले
नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन करताना मंगल प्रभात लोढा म्हणाले, “हे ठिकाण दिगंबर जैन समाजाने उपलब्ध करून दिले आहे. माझी अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वॉर्डात एक अधिकृत कबुतरखाना असावा. मुंबईत यापूर्वी या संदर्भात अनेक समस्या आल्याने आम्ही येथून सुरुवात केली आहे.”
दिगंबर जैन समाजाच्या पुढाकाराचे कौतुक करताना ते म्हणाले, “बॉम्बे उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर आम्ही कायदेशीर मार्ग काढून हे केंद्र सुरू केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील ही पहिलीच अशी सुविधा असल्याचा आम्हाला अभिमान आहे.” त्यांनी असेही सांगितले की दिगंबर जैन समाजाच्या मालकीची राष्ट्रीय उद्यानात 9 एकर जागा आहे, जिथे प्राणी आणि पक्षी मुक्तपणे फिरू शकतात.