एमटीडीसीच्या पहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे
*पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

 एमटीडीसीच्या पहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे*पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि १५: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) तर्फे तयार करण्यात आलेल्या पहिल्या-वहिल्या डिजिटल ई-ब्रोशरचे लोकार्पण पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या १७५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर हा कार्यक्रम संपन्न झाला. या उपक्रमाची संकल्पना व नेतृत्व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी केले. या प्रकल्पासाठी मार्गदर्शन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश र. गटणे यांनी केले. या लोकार्पण सोहळ्यास एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रसिद्धी विभागप्रमुख मानसी कोठारे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्र पर्यटनाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. या ई-ब्रोशरमुळे पर्यटकांना थेट आरक्षणाची सोय तर मिळेलच, तसेच आपल्या वर्तमान स्थानावरून पर्यटक निवास किती अंतरावर आहे, हेही सहज तपासता येईल. त्यामुळे पर्यटन अनुभव अधिक सुलभ व सोयीस्कर होईल.

प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे म्हणाले की, ई-ब्रोशरद्वारे महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती आधुनिक व सुलभ स्वरूपात उपलब्ध होत असून, पर्यटकांना प्रवास नियोजनात मोठी मदत होणार आहे.

व्यवस्थापकीय संचालक ‍निलेश र. गटणे म्हणाले की, पर्यटकांच्या सोयीसाठी फ्लिप-बुक स्वरूपासह विविध डिजिटल माध्यमांवर ई-ब्रोशर उपलब्ध करून देण्यात आले असून, ही संकल्पना पर्यटनाच्या प्रसाराला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

ई-ब्रोशर विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध

पर्यटकांना एमटीडीसीच्या विविध पर्यटन निवासस्थानांसाठी थेट ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी सोयीस्कर दुवे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे आरक्षण प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि वापरकर्त्यास अनुकूल झाली आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक व भौगोलिक वैशिष्ट्ये यांचा सविस्तर आढावा या ई-ब्रोशरमध्ये देण्यात आला आहे. प्रत्येक स्थळासाठी अक्षांश-रेखांश (Latitude-Longitude) नमूद केल्यामुळे पर्यटकांना प्रवास नियोजन करणे अधिक सोयीचे ठरणार आहे.या ई-ब्रोशरमध्ये माहितीबरोबरच छायाचित्रे, दृश्यात्मक मांडणी व प्रभावी मजकूराचा संगम साधला आहे. यामुळे वाचकांना पर्यटन स्थळांची माहिती रोचक व प्रभावी पद्धतीने मिळणार आहे. ई-ब्रोशर हे एमटीडीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅप व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही ते सहज शेअर व डाउनलोड करता येईल. पर्यटकांना ई-ब्रोशर सहज वाचता यावे यासाठी याची फ्लिप-बुक पद्धतीतील आवृत्ती देखील तयार करण्यात आली आहे. यामुळे छापील ब्रोशरसारखे पान उलटवत माहिती वाचण्याचा अनुभव मिळतो व हाताळणी सोपी होते. https://heyzine.com/flip-book/796ea99a4c.html ही फ्लिप-बुक लिंक आहे.

डिजिटल माध्यमाचा वापर करून महाराष्ट्र पर्यटनाची माहिती देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यास हे ई-ब्रोशर मोठी मदत करणार आहे. यामुळे पर्यटनाच्या प्रसारास चालना मिळून राज्याच्या पर्यटन विकासाला नवसंजीवनी मिळेल. या अभिनव उपक्रमामुळे महाराष्ट्र पर्यटनाच्या प्रसिद्धी व प्रसारात नवे पर्व सुरू झाले असून, पर्यटकांना राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती अधिक सुलभ व आकर्षक स्वरूपात मिळणार आहे.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *