‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ उपक्रमात, पाच लाख रूपयांचे पारितोषिक

मुंबई, दि. १५ :– राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल असे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची १७५ वी संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. पर्यटन विभागाचे प्रधानसचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनावणे, कंपनी सचिव वर्षा चव्हाण, कायदेशीर सल्लागार संजय ढेकणे उपस्थित होते.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचे सौंदर्य, वैविध्य आणि सांस्कृतिक समृद्धी याची प्रचार व प्रसिध्दी मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ हा उपक्रम राबवला जात आहे. तो अत्यंत चांगला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त पर्यटनप्रेमींनी सहभाग घ्यावा यासाठी प्रथम विजेत्याला २.५० लाख ऐवजी ५ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारितील सर्व रिसॉर्टसची उत्पन्ननिहाय वर्गवारी करण्यात यावी. रिसार्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणाऱ्या पर्यटन सुरक्षा दल निर्मितीबाबत वाहने घेण्याच्या कार्यवाहीला गती देण्यात यावी. महामंडळा
मार्फत निवास कार्य, व्यवसाय विकास, प्रसिद्धी अशा कार्यक्षेत्रात नवीन उपक्रम हाती घेतले आहेत त्यांना गती देण्यात यावी. क्रुझ पर्यटन विकास, जबाबदार पर्यटन, पी.एम.गतीशक्ती उपक्रमाशी सुसंगत डेटा आधारित नियोजन, समन्वय आणि पर्यटन प्रकल्पांचे नियोजन करावे. विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत उपक्रम प्रभावीपणे राबवावेत.
सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाचा अवलंब करण्यात यावा, गुलदार प्रकल्पाचे काम गतीने करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ उपक्रम
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ हा उपक्रम ‘एमटीडीसी’ मार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमात प्रवाशांनी घेतलेली निवडक छायाचित्रे, फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मन्थ, फोटो ऑफ दी इअर या श्रेणीमध्ये विभागणी करून समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील. डिजिटल फोटो गॅलरीमध्ये निवडक छायाचित्रकारांची माहिती प्रदर्शित केली जाईल. फोटो ऑफ दि इअर या श्रेणींसाठी नामवंत पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीकडून छायाचित्र निवडण्यात येतील.
प्रथम विजेत्यांस ५ लाख रूपये, प्रथम उपविजेता – १ लाख रूपये, द्वितीय उपविजेता – ७५ हजार, पाच उत्स्फुर्त पारितोषिके प्रत्येकी ५० हजार रूपये याप्रमाणे देण्यात येतील. फोटो ऑफ दि मन्थ विजेत्यांना दोन जणांसाठी तीन दिवस, दोन रात्रीचे एमटीडीसी रिसॉर्टमध्ये विनामूल्य राहता येईल. फोटो ऑफ दि डे, फोटो ऑफ दी मन्थ ची निवड समाजमाध्यमावरून मतदानावर आधारित निकषानुसार करण्यात येणार आहे.ML/ML/MS