*राज्यपाल आचार्य देवव्रत यांना राज्यपालपदाची शपथ

मुंबई दि १५ — गुजरातचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी देवव्रत यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्य न्यायमूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
संस्कृत भाषेतून घेतली शपथ
राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेऊन उपस्थितांना सुखद धक्का दिला. यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांचेकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.
शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी तसेच इतर कुटुंबीय, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनिषा म्हैसकर, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, उपसचिव एस राममूर्ती व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आचार्य देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली. सन २०१९ पासून आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते २०१५ ते २०१९ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. ML/ML/MS