रायगड जिल्ह्यात साखरचौथ गणेशोत्सवास सुरुवात

पेण, दि. 11 : रायगड जिल्ह्यात कालपासून भाद्रपद महिन्यातील कृष्ण चतुर्थीच्या (संकष्टी चतुर्थी) दिवशी साजरा होणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवाची सुरुवात झाली. जिल्ह्यात सुमारे ८८० गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सुबक गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरात सार्वजनिक ६७ आणि घरगुती १२० गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी दीड दिवसाचे असलेले हे गणपती आता काही ठिकाणी अडीच व पाच दिवसांसाठी विराजमान होतात. साखरचौथ गणपतीच्या प्रतिष्ठापनेमागे कोणतीही पौराणिक कथा अथवा शास्त्रीय आधार नाही. तरीसुद्धा अनेक वर्षांपासून ही परंपरा टिकून आहे.
गणेश चतुर्थीप्रमाणेच साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र नैवेद्य म्हणून गुळाऐवजी साखरेच्या सारणाचे मोदक बाप्पाला अर्पण केले जातात. आरतीसाठी परंपरेनुसार मोठ्या परातीत ताट सजवले जाते. आधी चंद्राला ओवाळून मग बाप्पाची आरती होते. काही भागात २१ साखरेचे मोदक, ५ दिवे, काकडीच्या चकत्या व केळी ठेवून आरती केली जाते.
भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला गणपती बसविणे शक्य नसणाऱ्यांसाठी हा पर्यायी उत्सव मानला जातो. पेणमध्ये मागील २५ ते ३० वर्षे हा उत्सव साजरा केला जातो. गुरव आळी आणि दामगुडे आळी येथून याची सुरुवात झाली. कालांतराने संपूर्ण शहरभर आणि तालुक्यात हा उत्सव लोकप्रिय झाला आहे.विभक्त कुटुंब संख्या वाढल्याने प्रत्येकाला स्वतःच्या घरी गणपती आणण्याची उत्सुकता असते. त्यामुळे ज्या कुटुंबांमध्ये मूळ गणपती गणेश चतुर्थीला बसवला जातो, तेथे दुसऱ्या सदस्यांकडून साखरचौथ बाप्पा आणला जातो. तसेच एखाद्या वर्षी सुतक, अपघात वा इतर कारणांमुळे गणेश चतुर्थीला मूर्ती बसवता न आल्यास भक्त साखरचौथीचा दिवस पूजेसाठी निवडतात.