नेपाळच्या तुरुंगातून १५ हजार कैद्यांचे पलायन, भारतात हाय अलर्ट

नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी संसद तसेच अनेक शासकीय इमारती आणि हॉटेल्सना आगी लावल्या. पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांना पलायन करावे लागले आहे. त्यानंतर आज नेपाळमध्ये घडलेल्या अभूतपूर्व तुरुंगफोडीच्या घटनेने संपूर्ण दक्षिण आशिया हादरून गेला आहे. नेपाळमधील विविध तुरुंगांमधून तब्बल १५,००० कैदी पळून गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नेपाळच्या इतिहासातील सर्वात मोठी तुरुंगफोड मानली जात असून, देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काठमांडू, ललितपूर, रामेछाप आणि बांके जिल्ह्यांतील प्रमुख तुरुंगांमध्ये ही घटना घडली असून, काही ठिकाणी पोलिसांनी गोळीबार करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात काही कैद्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत.
ही घटना नेपाळ सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या जनआंदोलनामुळे घडली आहे. या आंदोलनात आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाला असून १,००० हून अधिक जखमी झाले आहेत. देशभरात असंतोषाची लाट उसळली असून, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेत अनेक कैद्यांनी एकत्र येऊन तुरुंगातून पलायन केले.
भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून भारत-नेपाळ सीमावरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सशस्त्र सीमा बल (SSB) ने बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये संयुक्त गस्त सुरू केली असून, आतापर्यंत ६० पेक्षा अधिक कैद्यांना अटक करण्यात आली आहे. काही कैद्यांनी भारतीय नागरिक असल्याचा दावा केला असून त्याची चौकशी सुरू आहे. सीमावर्ती भागात कर्फ्यू लागू करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही घटना केवळ नेपाळसाठीच नव्हे तर भारतासाठीही गंभीर सुरक्षा आव्हान ठरू शकते. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण आशियातील स्थैर्य आणि शांततेसाठी ही घटना एक मोठा इशारा मानली जात आहे.